नांदेड-पुणे एक्सप्रेस आधुनिक कोचसह दररोज धावणार
परभणी : मनमाडमार्गे आठवड्यातून दोनदा धावणार्या नांदेड-हडपसर सुपरफास्ट रेल्वेचा विस्तार पुण्यापर्यंत करून ती आधुनिक एल हेच बी कोचसह दररोज धावणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या पदाधिकार्यांना दिली.

आज शनिवारी (दि.7) परभणी शहरात दानवे दौरा होता आमदार मेघना बोर्डीकर यांच्या निवासस्थानी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सविस्तराने चर्चा करून रेल्वे प्रश्नांबाबत एक निवेदन सादर करण्यात आले. त्या वेळी त्यांनी उत्तर देताना मनमाड ते औरंगाबादपर्यंत दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात औरंगाबाद ते परभणी दरम्यानच्या दुहेरीकरणाचे कामदेखील पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दानावे यांनी दिली. पुढील महिन्यात जालना स्थानकावर पीट लाईनचे उद्घाटन होणार असून औरंगाबाद येथे देखील एक पीटलाइन होणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
पंढरपूर रेल्वे परत येताना लातूर रोड स्थानकावर दररोज तीन-तीन तासापर्यंत उभे करण्याबाबत त्यांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी संबंधित रेल्वे अधिकार्यांना त्याचवेळी फोन लावून कोणत्याही रेल्वे स्थानकावर पंढरपूर रेल्वेला बिनकामी उभे करू नये असे ठणकावून सांगितले. तसेच विभागातील सर्व रेल्वे गाड्यांचा लूज टाईम रद्द करण्यासोबत मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेसला अतिरिक्त स्लीपर लावण्यासाठी अधिकार्यांना आदेश दिले. यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर, आनंद भरोसे हे उपस्थित होते. मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या शिष्टमंडळात अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे, प्रा.सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, प्रवीण थानवी, रवीकिरण गंभीरे यांचा समावेश होता.
