ओबीसी आरक्षणावरील फडणवीसांचे बोल म्हणजे ‘पुतणा मावशीचे प्रेम’
मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भारतीय जनता पक्षाला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपाचा डिएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे आणि आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपा दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे,अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
ओबीसी आरक्षणप्रश्नी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील आरक्षण संपवणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे आणि तो काही लपून राहिलेला नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज जो पेच निर्माण झाला आहे त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनीच केली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार असताना २०१७ साली नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लिअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. २०१८ साली उच्च न्यायालयाने सांगितले होते की आयोग बसवा परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले. महाविकास आघाडी सरकार यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु त्यासाठी आवश्यक असणारा ओबीसींचा डेटा देण्यास केंद्रातील मोदी सरकारनेही नकार देऊन महाराष्ट्र सरकारची कोंडी केली.
देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्ष ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. दोन वर्षे काय केले असा प्रश्न विचारत आहेत. मग फडणवीस सरकारने पाच वर्षे काय केले? मंडल आयोग लागू केल्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाला २७ टक्के आरक्षण लागू झाले. ह्या निर्णयाला देशभर भारतीय जनता पक्षानेच तीव्र विरोध केला होता हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह जे भाजपा नेते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला दोष देत आहेत त्यांनी आधी आपला इतिहास तपासून पहावा. ओबीसींच्या आरक्षणाचा मारेकरी भारतीय जनता पक्षच आहे, त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडून भाजपा आपल्या पापातून मुक्त होऊ शकत नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
