Wednesday, June 3, 2026
Latest NewsSports

रत्नागिरी, मुंबई उपनगर, ठाणे संघ उपांत्यपूर्व फेरीत

राज्य कबड्डी स्पर्धा :  मुलांच्या गटांत पुणे संघांचे आव्हान संपुष्टात

पुणे  : मुलांच्या गटात रत्नागिरी संघाने तर मुलींच्या गटात मुंबई उपनगर व ठाणे संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने युवानेते पार्थ पवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ४८ व्या कुमार – कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुलांच्या गटात रत्नागिरी संघाने पुणे संघाला पराभूत केल्याने पुणे संघाचे स्पर्धेतील आव्हान  संपुष्टात आले आहे.

मेट्रो ग्राउंड, साई चौक, बालेवाडी येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुलींच्या गटाच्या ठाणे संघाने अहमदनगर संघाला २५-२२ असे तीन गुणांच्या फरकाने पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मध्यांतराला नगर संघाने ३-९ अशी आघाडी घेतली होती. ठाणे संघाने देवायानी पाटीलने चढाई करताना तर मानसी गायकर ने पकडी करताना संघाचा गुणफलक हलता ठेवला. अहमदनगर संघाकडून स्नेहा पावरा व जयश्री बरिला यांनी सुरेख खेळ केला.

मुलींच्या गटाच्या मुंबई उपनगर संघाने रत्नागिरी संघाला ३८-१९ असे १८ गुणांनी पराभूत केले. मध्यंतर मुंबई संघाने २०-९ अशी आघाडी घेतली. मुंबई संघाकडून यशिका पुजारी व शुभदा खोत यांनी चढाया केल्या तर करीना कामतेकर व सानिका पाटील यांनी पकडी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून सानिका नाटेकर व सानिका भाटकर यांनी चांगली लढत दिली.

मुलांच्या गटात रत्नागिरी संघाने पुणे संघाला २७-२२ असे ५ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला पुणे संघाने ११-१० अशी निसटती आघाडी घेतली. रत्नागिरी संघाकडून शुभम पाटीलने चढाईत तर वेद पाटीलने पकडीत गुण मिळविताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पुणे संघाकडून अजित चौहान व राहुल वाघमारे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

तत्पूर्वी झालेल्या साखळी स्पर्धेत बीड संघाने जालना संघाला ३१-२० असे ११ गुणांनी पराभूत करताना स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला जालना संघाने १५-९ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बीड संघाच्या ऋषिकेश बोडखे व संकेत चौधरी यांनी खोलवर चढाया व उमेश जगदाळे व तेजस झगडे यांनी पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. युवराज जाधव व प्रवीण राठोड यांनी जालना संघाकडून चांगली लढत दिली.

मुलांच्या गटाच्या लढतीत सातारा संघाने लातूर संघाला ५४-२० असे ३४ गुणांनी पराभूत करताना स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला सातारा संघाने ३०-९ अशी आघाडी घेतली. सातारा संघाच्या अभिजित ढेरे व आनंद शिंदे यांनी तर लातूर संघाच्या सचिन राठोड व अजिंक्य कातळे यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading