Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

औंध येथील वाहतूक कोंडी बद्दल तातडीने उपाय योजना कराव्यात

सुनील माने यांचे आयुक्त तसेच वाहतूक पोलीस उपायुक्तांना निवेदन

पुणे : औंध – परिहार चौक, नागरस रोड, डीपी रोड, औंध – सांगवी जोडणारा राजीव गांधी पुल या परिसरात भाले चौक येथे दररोज आणि प्रामुख्याने सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात अशी विनंती भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना ई-मेलद्वारे तर वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना प्रत्यक्ष भेटून दिले.

निवेदनात म्हटले आहे की, औंध – परिहार चौक, नागरस रोड, डीपी रोड, येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. येथील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी औंध – सांगवी जोडणारा राजीव गांधी पुल बांधण्यात आला. मात्र तरीही येथील वाहतूक समस्या कायम आहे. अरुंद रस्त्यामुळे येथील भाले चौक येथे बॉटल नेक तयार होऊन सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या भागात असणारे शॉपिंग मॉल, आय.टी कंपन्या, दुकाने, स्थानिक रहिवासी यांच्यासाठी वाहतुकीचा प्रश्न जटील होत आहे. यासाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.

या भागातील स्थानिक नागरिकांना आणि परिसरात विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करणे, बैठक करणे, आणि सूचना घेऊन तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.

रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी सिंगापूर प्रमाणे बिल्डींग मधील रिकाम्या जागांचा उपयोग करता येईल का? काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक करता येईल का? लोकांची वाहने दूर अंतरावर पार्क करून त्यांना इलेक्ट्रिक बस व अन्य साधनांनी त्यांच्या इच्छित स्थळी नेता येईल का? या उपायांचा विचार करता येईल काय हे पाहावे, त्याचबरोबर या परिसरात प्रामुख्याने संध्याकाळ ते रात्रीपर्यंत अतिरिक्त वाहतूक पोलीस व वॉर्डन नियुक्त करावे. अशाप्रकारचे उपाय त्यांनी महापालिकेला तसेच वाहतूक विभागाला सुचवले आहेत. या पर्यायांवर विचार करून स्थानिक नागरिक व या भागात येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी विनंती ही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading