महापालिका प्रशासनाने निवडणुकीच्या कामकाजासाठी आवश्यक साहित्य खरेदीस दिली मान्यता
पुणे : महापालिका निवडणूकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांच्या आत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगास दिले आहेत. त्यानंतर महापालिका प्रशासनाने निवडणुकीच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या तब्बल 72 लाखांच्या साहित्य खरेदीस मान्यता दिली आहे.
यात कागदांपासून, फाइल, स्टेशनरी तसेच इतर आवश्यक असलेल्या साहित्याचा समावेश आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवला होता.
न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणूका जाहीर केल्या जाऊ शकतात. त्यामुळे, महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे, न्यायालयाचा निकाल येताच पालिकेने लगेचच कर्मचारी उपलब्धता तसेच बंदोबस्तासाठी पोलिसांशी चर्चा केली होती त्यानंतर आता लगेचच 72 लाखांच्या साहित्य खरेदीस मान्यताही दिली असल्याने प्रशासनाने निवडणूकीचे काम सुरू करण्याची तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यांत राबवावी, असे सर्वोच्च न्यालयाने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुकांचा कार्यक्रम यात फरक आहे. निवडणुकीचे एकूण चार टप्पे आहेत. पहिला प्रभाग रचनेचा, दुसरा आरक्षण सोडत, तिसरा मतदार याद्या आणि चौथा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणे. या चार टप्प्यांना किमान 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर पुढील 30 ते 40 दिवस लागतील. तोपर्यंत पावसाळा सुरू होत असल्याने निवडणुका झाल्याच तर प्रशासनाची धांदल उडणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाचा आदेश लक्षात घेत प्रशासनाने याची तयारी साहित्य खरेदीपासून सुरू केली आहे.
