डॉ. लक्ष्मी वेणू यांनी सुंदरम-क्लेटोन लिमिटेडच्या ​​व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला

चेन्नई : भारतातील आघाडीच्या वाहन घटक उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या सुंदरम- क्लेटोन लिमिटेड (एससीएल)च्या  आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत डॉ. लक्ष्मी वेणू यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. डॉ. वेणू या सुंदरम क्लेटोनच्या सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.

डॉ. लक्ष्मी वेणू एका दशकाहून अधिक काळापासून सुंदरम क्लेटोनचे नेतृत्व करत आहेत. जागतिक पातळीवर सुंदरम क्लेटोनचा ठसा उमटविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बहुतांश अमेरिकास्थित ग्राहक पुरवठा साखळीतील जोखीम कमी करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ऑन-शोअर फाउंड्री युनिट्सच्या शोधात असतानाच तीन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना मधील डॉरचेस्टर येथे फाऊंड्री स्थापन करण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत दूरदर्शी होता.

सुंदरम क्लेटोन लिमीटेडला जगातील एक स्पर्धात्मक, कार्यक्षम फाउंड्री बनवण्याचे काम त्यांनी केले आणि कमिन्स, ह्युंदाई, व्होल्वो, पॅकार आणि डेमलर यांच्याशी सखोल ग्राहक संबंध निर्माण केले.

सुंदरम क्लेटोनचे अध्यक्ष श्री आर गोपालन म्हणाले, “लक्ष्मी यांनी ग्राहकांना खोलवर समजून घेतले आहे आणि जागतिक पातळीवरील ग्राहकांशी मजबूत संबंध विकसित केले आहेत. स्पर्धात्मक लाभ उभारण्यासाठी जागतिक स्तरावर ठसा उमटविताना त्यांनी यशस्वीपणे एक धोरण आखले आहे. मला विश्वास आहे की यापुढेही सुंदरम-क्लेटोनचे जागतिक दर्जाच्या वाहन घटक उत्पादक कंपनीत रूपांतर करण्यासाठी त्या कार्यशील राहतील.”

सुंदरम-क्लेटोनच्या ऑडिट समितीचे अध्यक्ष अॅडमिरल पी जे जेकब (निवृत्त) म्हणाले, “सुंदरम क्लेटोनमध्ये लक्ष्मी वेणू यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती ही कंपनीच्या विकासामध्ये, विशेषतः अत्यंत कठीण काळात त्यांनी केलेल्या प्रचंड योगदानाची योग्य ओळख आहे. अगदी शॉप फ्लोअर पासून काम करून कंपनीच्या शिखरापर्यंत पोहोचण्याच्या कठीण मार्गावरून जात त्यांनी ही उंची गाठली आहे. कंपनीला आणखी उंचीवर नेण्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.”

सुंदरम क्लेटोनचे मानद अध्यक्ष श्री. वेणू श्रीनिवासन म्हणाले, “लक्ष्मी यांचे ध्येयकेंद्री उद्दिष्ट आणि गेल्या दहा वर्षांतील समर्पित प्रयत्नांमुळे कंपनीने गुणवत्ता, नफा आणि ओईएमशी संबंध निर्माण करताना मोठा पल्ला गाठला आहे. अलीकडेच कामकाजाला सुरुवात केलेल्या आमच्या यूएस ऑपरेशन्सच्या स्थापनेचे नेतृत्व त्यांनी केले आहे. आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली सुंदरम-क्लेटोन जागतिक स्तरावर नावारूपाला येईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: