पुणे, मुंबई उपनगर, पालघर, रायगड संघाची विजयी आगेकूच
पुणे : मुलांच्या गटात पुणे, मुंबई उपनगर संघांनी तर मुलींच्या गटात पालघर, रायगड संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने युवानेते पार्थ पवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ४८ व्या कुमार – कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.
मुलांच्या गटात पुणे संघाने मुंबई शहर संघाला ४३-३२ असे १० गुणांनी पराभूत करताना विजय साकारला. मध्यंतराला १७-१४ अशा तीन गुणांची पुणे संघाने आघाडी घेतली. पुणे संघाकडून कृष्णा शिंदेने चढाईमध्ये तर वरून खंडाळे याने पकडीमध्ये संघाला महत्त्वपूर्ण गुण मिळवून दिले. मुंबई शहर संघाच्या तुषार शिंदेने चढाई व सूरज सुतार यांने चांगल्या पकडी केल्या परंतु ते संघाला परभवापासून वाचवू शकले नाहीत.
मुंबई उपनगर संघाने रत्नागिरी संघाला २८-२५ असे तीन गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला मुंबई संघाने १४-१२ अशी २ गुणांची आघाडी घेतली. मुंबई उपनगर संघाकडून यश डोंगरेने चढाई करताना अभिषेक राजभर यांने पकडी करताना संघाला गुणांची कमाई करून दिली. रत्नागिरी संघाकडून वैभव उंदरेने चढाईत तर निलेश शिंदेने पकडी केल्या परंतु त्यांना पराभव टाळता आला नाही.
मुलींच्या गटाच्या लढतीत पालघर संघाने उस्मानाबाद संघाला ५५-९ असे ४६ गुणांनी पराभूत केले. पालघर संघाने मध्यंतराला ३५-४ अशी तब्बल ३१ गुणांची आघाडी घेतली. पालघर संघाकडून ऐश्वर्या पाटील व तन्वी सुर्वे यांनी तर उस्मानाबाद संघाकडून निकिता जावळे व साक्षीदार गिल्डा यांनी सुरेख केला.
रायगड संघाने बीड संघाला ६५-१९ असे ४६ गुणांनी पराभूत करताना आगेकूच कायम राखली. मध्यांतराला रायगड संघाने ३८-७ अशी आघाडी घेतली. रायगड संघाकडून ईशा पाटील व ऋतुजा पाटील यांनी चढाईमध्ये तर नंदिनी वाघे, रुपाली जाधव यांनी पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. बीड संघाकडून स्नेहल साक हिने दिलेली लढत अपुरी ठरली.
