fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

लोकाभिमुख निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

पुणे : राज्यात कोरोनाचे मोठे संकट असतानाही राज्य शासनाने अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यासोबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. राज्य शासनाचे निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे पुणे विभागीय प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

सहकारमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि अवघ्या काही दिवसातच कोरोनाचे मोठे संकट आले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना काळातही कोरोना उपाययोजना सोबतच राज्याच्या विकासासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. गेल्या चार महिन्यात दळणवळण सुरू झाल्यामुळे विकासकामाला आणखी गती आली आहे.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुणे विभागाच्यावतीने आयोजित प्रदर्शनात सर्व योजनांची माहिती मिळते. सर्वसामान्यांना उपयुक्त अशी माहिती देणारे प्रदर्शन आहे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हे प्रदर्शन नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमात सहकार्य देणाऱ्या सर्व यंत्रणांचे त्यांनी कौतुक केले.

मान्यवरांच्या प्रदर्शनाला भेटी
खासदार गिरीश बापट, माजी आमदार उल्हास पवार, रमेश बागवे, मोहन जोशी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, राज्य ग्रामविकास संस्था यशदाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, विभागीय पारपत्र अधिकारी अनंत ताकवलेयांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनीदेखील प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.

प्रदर्शन फारच छान आहे. विविध विभागाची माहिती चांगल्याप्रकारे दाखवली आहे. अशा माध्यमातून सर्व माहिती सामन्यापर्यत पोहोचावी, अशी अपेक्षा खासदार बापट यांनी व्यक्त केली. माजी आमदार मोहन जोशी यांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळातही राज्यातील सर्व घटकासाठी राज्य शासनाने केलेल्या चांगल्या कामाचे तेवढेच चांगले सादरीकरण प्रदर्शनाद्वारे झाल्याची प्रतिक्रिया दिली. विविध विकासकामे आणि योजना चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.

यशदा येथील आदिवासी विकास विभागाच्या वर्ग-2 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. शासकीय कामकाजात ही माहिती उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading