fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

डॉ.ढेरे यांच्या संग्रहातील पुस्तके विद्यापीठाला भेट

पुणे : डॉ. रा. चि. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्राच्या वतीने डॉ. ढेरे यांच्या ग्रंथसंग्रहातल्या ललित कलाविषयक मौलिक पुस्तकांची भेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला विभागाला आज देण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी हा संग्रह स्वीकारला.

डॉ. रा. चि. ढेरे हे मुख्यत: संतवाङमय आणि मध्ययुगीन मराठी वाङमयाचे संशोधक-अभ्यासक म्हणोन ओळखले जात असले, तरी महाराष्ट्र संस्कृतीचा त्यांचा अभ्यास बहुमुखी आणि तलस्पर्शी होता. साहित्य आणि अन्य कला हे संस्कृतीचे चैतन्यशील अविष्कार आहेत याची उत्तम जाण असल्यामुळे, त्यांच्या चिंतनात जुन्या-नव्या सांस्कृतिक विषयांचा सहज समन्वय दिसत असे. भारतीय रंगभूमीच्या शोधात हे डॉ. ढेरे यांचे पुस्तक तर त्यांच्या नाटयविषयक विचारांची साक्ष देणारे आहेच, पण सतीश आळेकर यांच्या महानिर्वाण सारख्या नाटयकृतीचा त्यांनी लोकसांस्कृतिक अंगाने घेतलेला परामर्शही त्यांच्या नाटयविषयक वेगळया मर्मदृष्टीची ओळख देणारा आहे. डॉ. ढेरे यांच्या मर्मदृष्टीने जमा केलेली, मुख्यत: नाटय आणि संगीतविषयक पुस्तके आता विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात समाविष्ट होत आहेत. भारतीय नाटयाचे स्वरूप आणि परंपरा, बंगाली, गुजराती, तमिळ, कानडी रंगभूमी, प्राचीन भारतीय नाटक, धर्मपरंपरा आणि नाटक यांच्याविषयीचे नाटक तर या संग्रहात आहेतच, त्याशिवाय किर्लोस्कर-देवलांपासून दलित रंगभूमीपर्यंतची मराठी नाटयसृष्टी, मराठी नाटककार आणि मराठी नाटकांचाही त्यात समावेश आहे. प्राचीन भारतीय नाटकांचा ग्रीक रंगभूमीशी असलेला संबंध, विसाव्या शतकातली अमेरिकन रंगभूमी, रशियन रंगभूमी आणि स्टॅनिस्लावस्की ते पीटर ब्रुक अशा प्रायोगिक रंगभूमीवरची पुस्तके या संग्रहात आहेत आणि रंगभूमीच्या बदलत्या भाषेचा अभ्यास मांडणारी, तसेच ब्रेख्ट, युजिन ओ’ निलपासून ॲबसर्ड थिएटरचा आणि रंगभूमीवरील नेपथ्यासह नाटयविषयक अनेकविध अंगांचा शोध घेणारी पुस्तकेही आहेत. अनेक संगीतकार, गायक नटांची चरित्रे, नाटयसंगीतापासून ठुमरीसंग्रहापर्यंतचे संगीतविषयक ग्रंथ तर या संग्रहात आहेतच, पण भारतीय कलादृष्टी, रसभावविचार, भारतीय वाद्ये, भारतीय चित्रकला, भारतीय नृत्ये, भारतीय शिल्प आणि वाद्ये अशाही विषयांवरच्या पुस्कांनी या संग्रहाचे मोल वाढले आहे.

ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी हा संग्रह केंद्राकडे आला याचा आनंद व्यक्त केला आणि तो केंद्राच्या विद्यार्थ्यांसह अध्यापकांनाही अत्यंत उपयुक्त असल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading