रेशन आपल्या हक्काचं’ जनजागृती अभियान वडारवाडीत
पुणे : मागील दीड-दोन महिन्यांपासून लोकायत नागरी समितीच्या वतीने वडारवाडी ३९१, कॉपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, मारुती मंदिराजवळ परिसर, वडारवाडी आणि जुनी वडारवाडी भागात ’रेशन आपल्या हक्काचं’ नावानं रेशन विषयक जनजागृती अभियान आणि लोकांच्या तक्रारी घेण्याचे काम चालू होते. पोस्टर प्रदर्शन, पडद्यावर प्रदर्शन, सभा, घरोघरी जाऊन अभियान अशा विविध माध्यमांतून हे अभियान राबवण्यात आले.
अभियानादरम्यान लोकांच्या बऱ्याच तक्रारी आल्या. लोकांचे रेशन विविध कारणांनी बंद पडले होते, काहींना कमी धान्य मिळत होते, अनेकांना खराब रेशन मिळत असल्याचे निदर्शनास आले. अशा विविध तक्रारींचे अर्ज घेऊन दिनांक ०४ मे २०२२ रोजी लोकायत नागरी समितीचे कार्यकर्ते कल्याणी दुर्गा रविंद्र, मंगल निकम, अशोक अलकुंटे, रोहित मदुरे आणि तक्रार असलेले स्थानिक नागरिक मिळून परिमंडळ ‘क’ व ‘ल’च्या अधिकारी संगिता खोमणे यांना भेटण्यास गेले होते. मिटिंग संदर्भात वेळ देऊन उपस्थित राहिल्या नाहीत. शिवाय त्यांचे इतर अधिकारी आवश्यक कागदपत्र जोडले नसल्या कारणास्तव अर्ज स्वीकारण्यास तयार नव्हते. पण लोकायत नागरी समितीकडून मंगल यांनी युक्तिवाद केल्यानंतर सर्व लोकांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा केली. त्यानंतर अधिकारी असे म्हणाले की, सर्व नागरिकांच्या अर्जांची व्यवस्थित शहानिशा करण्यात येईल. त्यानुसार पुढील आवश्यक ती पावलं उचलली जातील.”
लोकायत नागरी समितीच्या कार्यकर्त्या मंगल निकम म्हणाल्या की, रेशन हा लोकांना संविधानाने दिलेला अधिकार आहे. खरं तर उत्पन्नाची कुठलीही मर्यादा न ठेवता पूर्वीप्रमाणे लोकांना रेशन मिळालं पाहिजे. सध्याच्या वाढलेल्या महागाईत लोकांचं जगणं अवघड झालं आहे. अशावेळी लोकांना रेशनमध्ये धान्य मिळणं हा संसारासाठी मोठा हातभार आहे. आम्ही लोकायत नागरी समितीच्या वतीने लोकांना आपल्या हक्कांबद्दल जागृत करत आहोत.
कल्याणी दुर्गा रवींद्र यांनी असे सांगितले की परिमंडळ अधिकारी यांनी वेळ देऊन सुद्धा मिटिंग करीता थांबल्या नाहीत यासंदर्भात अन्न वितरण अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे व याव्यतिरिक्त वस्तीतील बहुतांशी लोकांना हे माहित नाही की रेशन बंद झाले तर कुठे जावे? रेशन चालू करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? तक्रार कशी करावी? अशा अनेक बाबतींत जनतेला जागृत करणे आवश्यक आहे. त्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करणे गरजेचे आहे.
अधिकारी लोकांचे गरिबांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा उदासीनपणा बदलायला पाहिजे यासाठी सातत्याने याविषयावर शहर भरात काम करत राहू. लोकायत नागरी समितीच्या कार्यकर्त्यां सोबत नागरिकांनी असा निर्धार केला.
