‘महालक्ष्मीला’ मोगऱ्यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

पुणे : मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला घातलेला पोशाख… श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीचे पुष्पाभिषेक केल्यानंतर दिसणारे विलोभनीय रुप… मंदिराचा गाभारा व सभामंडपातील विविधरंगी पुष्पांची आरास पाहण्याकरीता देवीभक्तींनी गर्दी केली. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोग-याच्या हजारो फुलांचा सुगंध दरवळत होता. यावेळी आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला.

निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वासंतिक मोगरा व आंबा महोत्सवाचे. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते.

मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १५१ किलो मोगरा, २५१ गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. तसेच मंदिरात आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. तब्बल २ हजार आंब्याचा महानैवेद्य देवीला दाखविण्यात आला होता. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीसमोर आंब्याचा महानैवेद्य दाखविण्यात आला. फुलांची आरास आणि आंबा महोत्सव पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. सामाजिक संस्थांना आंबे प्रसाद म्हणून देणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: