चांगल्या पत्रकारितेला वाचकांचाही प्रतिसाद ही हवाच!

पुणे : सोशल मीडियाच्या काळात जबाबदार पत्रकारिता ही पत्रकारांची एक जबाबदारी नक्कीच आहे. पण अशा बातमीदारीला चांगला प्रतिसाद देणे ही वाचक, प्रेक्षक यांची जबाबदारी असून, त्यांनी देखील आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली पाहिजे, असे मत माध्यम प्रतिनिधींनी व्यक्त केले.

डिजिटल मीडिया प्रेमी मंडळीतर्फे आयोजित व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंटस् सहआयोजित दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनात आयोजित ‘पत्रकारिता आजची आणि उद्याची’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात बीबीसी मराठीचे महाराष्ट्र प्रतिनिधी मयुरेश कोण्णुर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, प्रसन्न जोशी, बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित, डिजिटल महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अभिजित कांबळे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी संमेलनाचे आयोजक मंगेश वाघ, समीर आठल्ये आणि प्रदीप लोखंडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरदेसाई म्हणाले, “तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी बदलल्या. आता सगळ्या गोष्टी लाइव्ह होत आहेत, मात्र बातमीची सत्यता पडताळण्यासाठी कोणातीच यंत्रणा नाही. समाज माध्यमांवर पत्रकार नसलेले सॉफ्टवेअर इंजिनीअर हे अल्गोरिदमच्या माध्यमातून बातम्यांचा क्रम ठरवत आहे. लोकांना बातमीत सेन्स नको तर सेन्सेशन हवे आहे.”

प्रसन्न जोशी म्हणाले, “आजूबाजूची परिस्थिती तटस्थ नसल्याने तटस्थ बातमीवर त्याचा परिणाम होत आहे. तुम्ही कोणतीही बातमी द्या, तुमच्यावर सतत दोन्ही बाजूंनी टीका होत असते. त्यामुळे माध्यमे, बातमीदारी बदलायला हवी म्हणत असताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, लोकांमुळे माध्यमे बदलली आहेत. याची लोकांवर काहीच जबाबदारी नाही आणि ते चांगल्या कार्यक्रमांना प्रतिसाद देत नाहीत, ही आजची परिस्थिती आहे.”

आशिष दीक्षित म्हणाले, “ सोशल मीडियावर प्रकाशित होणाऱ्या बातम्यांमध्ये भावनांना जास्त महत्त्व दिले जाते. न्युजरुममध्ये ट्रेंड पाहिले जातात आणि भावनेनुसार अजेंडा सेटिंग केले जाते. मात्र पत्रकारितेच्या या खालावत असलेल्या दर्जाबाबत पत्रकारांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. चांगल्या पत्रकारितेची आर्थिक गणिते जुळविण्यासाठी वेगळे रेव्हेन्यू मॉडेल विकसित करण्याची गरज आहे.”

अभिजित कांबळे म्हणाले, “सोशल मीडियाने माध्यमांचे लोकशाहीकरण केले आहे. पत्रकारांनी एखादी चूक केली, की त्यांना जाळ्यात पकडण्यासाठी काही लोक सतत काम करीत असतात. सोशल मीडियाच्या काळात वाचक आणि पत्रकार यांच्यामध्ये समतोल साधणे ही तारेवरची कसरत आहे. मात्र, काय वाचायचे याचे लोकशिक्षण होणे गरजेचे आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: