तब्बल १५०० वर्षांपूर्वीच्या दिव्यासह ३५० प्राचीन दिव्यांचा संग्रह आता संकेस्थळावर

पुणे : भारतीय संस्कृतीची समृद्धता जगभर विस्तारण्याकरीता संकेतस्थळाचा आधार घेत स्वतःच्या संग्रहातील तब्बल १५०० वर्षांपूर्वीच्या दिव्यासह इतर ३५० प्राचीन दिव्यांचा संग्रह पुण्यातील प्रा. श्याम जोशी यांनी जगभरातील कलारसिकांकरिता विनामूल्य खुला केला आहे. प्रा. श्याम जोशी यांच्या अँटिक लॅम्प कलेक्शनच्या संकेस्थळाचे उद्घाटन नुकतेच झाले असून हा अनमोल खजिना आता जगभरातून घरबसल्या पाहता येणार आहे.

प्रा.श्याम जोशी यांच्या अँटिक लॅम्प कलेक्शनच्या http://www.ignitedcorners.com या संकेतस्थळाचे उद्घाटन भांडारकर इन्स्टिट्यूट च्या सभागृहात झाले. यावेळी पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. गो.बं. देगलूरकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते राहुल सोलापूरकर, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, विक्रम गायकवाड, अक्षय वाघमारे, चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आदी उपस्थित होते.

पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, दिव्यांचा प्रकाश जोपर्यंत तुमच्या अंतरंगाचा प्रकाश होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्हाला आयुष्य कळाले नाही. दिव्याला ज्याप्रमाणे फाउंडेशन असते त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याला ही असते, आपल्या आई-वडिलांचे संस्कार हे आपले फाउंडेशन आहे. दिवे जमवणे किंवा कोणताही छंद जोपासणे हे सोपे नाही त्यामागे खूप मोठे तत्त्वज्ञान असते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गो.बं. देगलूरकर म्हणाले, श्याम जोशी यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. काही लोक हे जन्मतःच अनेक गोष्टी घेऊन येतात, तर काही जण जन्माला आल्यानंतर यश संपादन करतात. श्याम जोशी यांनी अनेक दिवे गोळा केले आणि त्या दिव्यांची माहिती देण्याचे काम ते करीत आहेत.

प्रा. श्याम जोशी म्हणाले, आपला इतिहास, संस्कृती, परंपरा असे अनेक कोपरे प्रज्वलित करण्यासाठी नव्या प्रकाश वाटा उलगडणारा हा उपक्रम आहे. या संकेस्थळावर प्राचीन दिव्यांच्या संग्रहाची सविस्तर माहिती दिलेली आहे.हे संकेतस्थळ कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता सुरू केले आहे . कलारसिकांनी यावरून प्राचीन दिवे पाहून त्याचा इतिहास समजून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: