सोशल मीडियाचा वापर राष्ट्रनिर्माणासाठी व्हावा – नितीन गडकरी 

दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा ‘लाइव्ह’ संवाद
पुणे :  “आपली संस्कृती ही विश्वकल्याणाची शिकवण देणारी आहे. सामाजिक द्वेष, तेढ निर्माण होईल, अशांती, असंतोष होईल, अशाप्रकारची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर करणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. सोशल मीडियाचा उपयोग राष्ट्रनिर्माण, सामाजिक सुधारणा करण्यास व्हावा,” असा संदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाच्या शेवटच्या दिवशी नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. गडकरी म्हणाले, “सोशल मीडियाने आपले जीवन बदलले, व्यवसाय व्यवहार यांचे स्वरुप बदलले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ‘नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन’ घडत आहे. सोशल मीडिया हे शिक्षणासाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. संगीत, नृत्य अशा आपल्या भारतीय कलांचे शिक्षण जगभरातील विद्यार्थ्यांना देणे यामुळे शक्य होत आहे. प्रबोधन, प्रशिक्षण, संशोधन आणि विकास याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून घडत आहे.”
मात्र त्याची वाईट बाजूदेखील आहे. सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी टाकून त्याचा दुरुपयोगदेखील केला जातो. काही प्रवृत्ती त्याचा गैरवापर करून समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पोस्टकडे दुर्लक्ष करत, सोशल मीडियाचा सकारात्मक दृष्टीने वापर करण्याचा निर्धार प्रत्येक व्यक्तीने करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: