Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

पंडिता रमाबाई ही भारताला मिळालेली देणगी : डॉ. अघमकर

पुणे : भारतीय महिलांच्या उध्दारासाठी जीवन समर्पित करणाऱ्या स्त्री उध्दारक, विदुषी पंडिता रमाबाई यांच्या १६४ व्या जयंतीनिमित्त पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ( केडगाव ) यांच्या वतीने पुण्यात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

शासनाच्या महिला, बालविकास विभागाच्या सहआयुक्त मनिषा बायररिस,अॅड. मार्कस देशमुख ,अनुपमा सायलास , डॉ.महेंद्र चित्रे, अनु डोंगरदिवे, अनिल फ्रान्सिस,डॉ लॉरेन फ्रान्सिस ( संचालक, पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ) , मनसे पुणे शहराध्यक्ष,माजी नगरसेवक साईनाथ बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम वाय एम सी ए सभागृह ( क्वार्टर गेट ) येथे २३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते साडेनऊ या वेळेत झाला.

पंडिता रमाबाई यांच्या ‘माझी साक्ष ‘ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले. पंडिता रमाबाई यांच्या जीवनाचा डॉ अतुल अघमकर यांनी परिचय करुन दिला. पंडिता रमाबाई यांच्या विचारांमुळे ज्यांच्या जीवनात परिवर्तन घडले, अशा महिला, युवतीनी मनोगत व्यक्त केले. त्यात शकुंतला ठाकरे, मनोरंजना साठे, मुक्ता, अनुपमा सायलस यांचा समावेश होता.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता.रेव्हरंड चंद्रशेखर जाधव यांनी प्रार्थना सादर केली. तेजस देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

पंडिता रमाबाई या बुद्धी वैभवामुळे प्रकाशात आल्या.पंडिता रमाबाई ही भारताला मिळालेली देणगी आहे. त्यांच्या जीवनकार्याची पुन्हा ओळख करुन देण्याची गरज आहे, असे उद्गार डॉ. अतुल अघमकर यांनी काढले.

ते म्हणाले, ‘ रमाबाई या उच्च कोटीच्या विदुषी होत्या. एकपाठी रमाबाईंचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. प्रवाहाच्या विरोधात जाणारा क्रांतीकारक स्वभाव होता. स्वतःच्या वाट्याला आलेल्या हालअपेष्टाचा उच्चार त्यांनी केला नाही.कोणत्याच समाजाच्या चाकोरीत त्या बसू शकत नव्हत्या. त्या स्वयंभू नेतृत्व होत्या. हजारो दिनदुबळ्या महिलांच्या आयुष्यात त्यांनी मुक्तीचा प्रकाश आणला. त्यामुळे त्या प्रातःस्मरणीय आहेत. त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे.

मनिषा बायररिस म्हणाल्या, ‘ विधवा, परित्यक्ता स्त्रियांना आयुष्यात उभे करण्यासाठी पंडिता रमाबाई यांची कणव गरजेची आहे. ‘

पंडिता रमाबाई यांना भारतरत्न मिळावे, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, केडगाव रेल्वे स्टेशनला रमाबाईंचे नाव द्यावे, ख्रिस्ती समाजाला विधीमंडळात प्रतिनिधीत्व मिळावे , राज्य महामार्गाच्या कामात रमाबाई मुक्ती मिशनची जागा घेतली जाऊ नये,अशी मागणी मार्कस देशमुख यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading