क्षमतेची जाणीव झाल्यास अशक्य गोष्टही शक्य – प्रतापराव पवार

पुणे – आपली क्षमता काय आहे, याची जाणीव झाली तर विशिष्ट कार्यमर्यादेत कोणतीही गोष्ट सहज पूर्ण करता येते. याचे उदाहरण म्हणजे विद्यार्थी साहाय्यक समितीला मिळालेले आयएसओ मानांकन. या मानांकनामुळे समितीतील कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे, असे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थी साहाय्यक समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून त्याच्या प्रमाणपत्राचे वितरण शुक्रवारी झाले. आयएसओ सर्टिफिकेशन्सचे डॉ. सुरेश माळी यांच्या हस्ते पवार यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

आयएसओ मानांकन मिळवलेली ही पुणे जिल्ह्यातील पहिलीच वसतिगृह साखळी असल्याचे डॉ. माळी यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे मराठीतून दस्तावेज तयार करणारी ही पहिलीच संस्था असल्याचेही त्यांनी नमूद केले.

समितीत होणाऱ्या संस्कारांमुळे येथील विद्यार्थी समाजाप्रती कायम बांधिल राहतो. कोरोना काळात विद्यार्थ्यांना लाखो लोकांना केलेले अन्नदान, वृक्षलागवड हे उपक्रम त्याचेच द्योतक आहे, असे पवार यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. आयएसओ मानांकन घेण्यामागची भूमिका समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी मांडली. कार्यालय उपसमिती  अध्यक्ष मनोज गायकवाड आणि आयएसओचे  कन्सल्टंट सुहास गोळे यांनी मनोगत केले. श्रुती  साने यांनी सूत्रसंचालन तर अपर्णा बापट- घोडके यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: