‘एलजीबीटीक्यूआयए’या विषयावर विद्यापीठात मुक्त चर्चा

पुणे : समलिंगी व्यक्ती, पारलैंगिक व्यक्ती या समाजाचा भाग आहेत. आपली लैंगिकता ही बदलती गोष्ट असते. तिच्या बाबतीत जितकं स्वातंत्र्य आणि आदर आपल्याला हवा असतो, तितकंच स्वातंत्र्य आणि आदर आपण सर्वांच्या लैंगिकतेसंदर्भात द्यायला हवे असे मत एलजीबीटीक्यूआयए समुदायासाठी काम करणारे जमीर कांबळे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात काल (दि. १८) ‘LGBTQIA+ : दुर्लक्ष, द्वेष, दयाबुद्धी की दोस्ती?’ या नावानं मुक्त चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जमीर कांबळे यांनी विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांच्या विविध प्रश्नांना उत्तरं देत आणि संवादाच्या नव्या शक्यता मांडत ही चर्चा केली.

समलैंगिकता वा पारलैंगिकता या प्राणिसृष्टीपासून मानवापर्यंत सर्वांमध्ये आढळतात. त्यात अनैसर्गिक किंवा अनैतिक काही नाही. व्यक्तींनी एकमेकांना समान मोकळीक द्यायची, तर एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. आणि आपल्याला एकमेकांसोबत बांधून ठेवणारे बंधुतेचे धागे असतील तरच हा आदर करावा असं वाटेल’ असं सांगून कांबळे यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची खासगी आणि सार्वजनिक जगण्यामधील आवश्यकता अधोरेखित केली.

‘एकंदर समाजात जशा व्यक्ती तितक्या प्रकृती आढळतात, त्याचप्रमाणे LGBTQIA+ व्यक्तींमध्येही सर्व प्रकारची माणसं असतात. कोणत्याही समूहात संपूर्ण सद्गुणी किंवा संपूर्ण दुर्गुणी अशी माणसं नसतात, तर त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांची वागणुकीची निवड कधी योग्य किंवा अयोग्य ठरत असते. सर्व व्यक्तींना मोकळेपणानं आपण आहोत, तसंच व्यक्त होण्याची मुभा असेल, तर अनेक प्रकारचा अन्याय आणि कोंडमारा टाळता येतो. आपण त्यासाठी माणसांनी केलेल्या निवडींबाबत आदरपूर्वक खुलेपणाची वागणूक ठेवायला हवी आणि संस्थात्मक पातळीवरही हा खुलेपणा असावा’ अशी अपेक्षाही कांबळे यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र अशा विविध विभागांतून तसंच महाविद्यालयांमधून आलेल्या सत्तरावर विद्यार्थ्यांनी या चर्चेत उत्साहानं सहभाग नोंदवला. इतिहासविभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी प्रास्तविक केले.

प्रा. बाबासाहेब दूधभाते यांनी अक्षरांची साक्षरता जशी आवश्यक आहे तशीच ही समतेची साक्षरताही आवश्यक असल्याचं सांगितलं. अशा मोकळ्या चर्चांच्या माध्यमातून व्यक्ती, कुटुंबं आणि समाजात खुलं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्था उचलतील तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक समाज होऊ असंही ते म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: