खडसेंनी पक्षाला मोठं केलं ? का पक्षाने खडसेंना मोठं केलं? – गिरीश महाजन
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडले असून ते अनेकदा बेछूट आरोप करताना दिसतात. लायकी नसताना पक्षाने एकनाथ खडसे यांना मोठी पदे दिली. यावरून खडसेंनी पक्षाला मोठं केलं का? पक्षाने खडसेंना मोठं केलं? असा सवाल उपस्थित करत भाजपा नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे.
पुण्यातील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
खडसेंवर टीका करताना महाजन म्हणाले की, लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पदं दिली. ग्रामपंचायतमध्ये पडले. नगरपालिकेत आमचा महापौर आहे. मुलगी विधानसभेला उभी राहिली आणि पडली. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तर ग्रामपंचायतीला पडतो का? असा खोचक सवाल महाजनांनी केला. खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांचं भाषण मी ऐकलं, म्हणाले दोन चार माणसांना जेलमध्ये टाका. एखादा विक्षिप्त माणूसच असं करू शकतो, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली.
