क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ.डी.के. अभ्यंकर यांचा पंचाहत्तरीनिमित सन्मान
पुणे : क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ.डी.के. अभ्यंकर यांचा पंचाहत्तरीनिमित सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल अणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शारदा-ज्ञान-पीठम आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आणि क्रेडाई महाराष्ट्र यांच्या सहकार्याने 16 एप्रिल रोजी डी पी.रस्ता येथील शुभारंभ लॉन्स येथे हा सन्मान सोहळा पार पडला.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, क्रेडाई नॅशनल’चे उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया, शारदा-ज्ञान-पीठम’चे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’चे माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव, क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष सुनील फुरदे, क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष अनिल फरांदे, क्रेडाई पुणे मेट्रो’चे माजी अध्यक्ष सुहास मर्चंट हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. डी.के. अभ्यंकर यांच्या जीवनावर आधारित गौरविकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच क्रेडाई महाराष्ट्र’च्यावतीने डॉ. अभ्यंकर यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले,” काही माणसं ही विद्वान असतात, तसेच आपल्या विद्वतेचा उपयोग केवळ स्वतःसाठी न करता इतरानांही ते उत्तम मार्गदर्शन करतात. डॉ. डी. के.अभ्यंकर हे अशीच व्यक्ती आहेत. एमसीसीआयएसारख्या अनेक संस्थांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे हे मार्गदर्शन यापुढील काळातही सर्वांना मिळत राहो ही अपेक्षा आहे.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले,” डॉ. डी. के. अभ्यंकर हे शिक्षण क्षेत्रासाठी भरभरून मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व आहे. गेली अनेक वर्षे विद्यापीठाशी त्यांचा जवळचा संबंध आहे. विद्यापीठातर्फे जी पारितोषिक विद्यार्थ्यांना दिली जातात, त्यामध्ये डॉ. अभ्यंकर यांचा सिंहाचा वाटा असून, त्यांच्या माध्यमातून पाच सुवर्णपदक विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिली जातात. शहराच्या विकासासाठी झटणारे आणि पुण्याची खडानखडा माहिती असणारे डॉ. अभ्यंकर हे एक चालता बोलता कोष आहे.’’
डॉ. अभ्यंकर हे कुशल प्रशासक, अभ्यासू व्यक्ती आणि सुमारे ५०० विकसक सदस्य असलेल्या संस्थेला अतिशय शिस्तबद्दपणे संभाळणारे कुशल नेतृत्व आहेत. संयमितपणा, वक्तशीरपणा, हे डॉ. अभ्यंकर यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे, असे मत शांतिलाल कटारिया यांनी व्यक्त केले.
या सन्मानाबाबत कृतज्ञता व्यक्त करत डॉ. डी. के. अभ्यंकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आगामी शैक्षणिक वर्षापासून बांधकाम व्यवस्थापन विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांनादेखील ‘सुवर्णपदकाने’ गौरविणार असल्याची घोषणा केली.
