सुमधुर भक्ती गीतांनी रंगला भजन रंग

पुणे : गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, सुंदरते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी अशा सुमधुर आणि रसिकांना तल्लीन करणाऱ्या भक्ती गीतांनी जेष्ठ गायक राजेश दातार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भजन रंग हा कार्यक्रम रंगवला.
 श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३२ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त राजेश दातार यांच्या भजन रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे.
राजेश दातार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या वेळी भक्ती गीत सादर करण्याबरोबरच महाराष्ट्राची वैभवशाली संत परंपरेचे महत्वही रसिकांना उलगडून सांगितले. गायिका प्रज्ञा देशपांडे, अविनाश इकोन तिकोणकर नितीन तिकोणकर यांनी त्यांना साथ संगत केली. दयानंद घोटकर यांनी कार्यक्रमाचे निरूपण आणि निवेदन केले.
गुरूचे महात्म्य उलगडून सांगणारे ‘ गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा विश्वासू ‘  या अवीट गोडीच्या गीताने राजेश दातार यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘ माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी ‘ या गीतातून वारकऱ्यांची मनोभावना उलगडून सांगितली. भक्तीगीतांमधून गायकांनी महाराष्ट्राची वारकरी परंपरा सांगितली. ‘ उडवू नको रे कान्हा रंग थांब थांब थांब ‘ या गीतातून कलाकारांनी श्रीकृष्णाच्या लीला रसिकांसमोर  मांडल्या. त्यानंतर गायिका प्रज्ञा देशपांडे यांनी ‘ भेटी लागी जीवा लागलीसे आस ‘ या गीतातून भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली.
विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने  हे उत्सवाचे वैशिष्ट्य असते. यंदा डॉ.योगेश गोडबोले, डॉ.सागर देशपांडे, दत्तात्रेय धाईंजे, श्रीनिवास पेंडसे, प्रा.मुक्ता गरसोळे- कुलकर्णी, डॉ. दत्तात्रेय तापकीर, डॉ अविनाश भोंडवे, डॉ. चंद्रशेखर टिळक, चंद्रकांत शहासने, विद्या लव्हेकर, सचिन पवार, आदित्य अभ्यंकर, डॉ. रवींद्र भोळे आदी मान्यवरांची व्याख्याने उत्सवात झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: