नृत्य सादरीकरणातून उलगडले चार ऋतूंचे अंतरंग
पुणे : दाहकतेची अनुभूती देणारा ग्रीष्म ऋतू असो, की चिंब भिजविणारा वर्षा ऋतू असो, शिशिर असो की नव-पालवीचा वसंत ऋतू असो अशा चारही ऋतूंचे अंतरंग नृत्य सादरीकरणातून उलगडले. निमित्त होते ‘सिंधू’ या नृत्य महोत्सवाचे.
‘सांख्य डान्स कंपनी’ आणि ‘मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १६ एप्रिल दरम्यान दहाव्या ‘सिंधू महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या नृत्य महोत्सवाचे उदघाटन गुरुवारी, दिनांक १४ एप्रिल रोजी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झाले.
यावेळी ‘सांख्य डान्स कंपनी’चे वैभव आरेकर, सहदिग्दर्शक सुशांत जाधव, पुण्यातील मुद्रा नृत्यालयाच्या संस्थापिका पूनम गोखले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नृत्यांगना दिव्या देवगुप्तानू यांनी भरतनाट्यम नृत्यातून ‘संहिता’ हा कार्यक्रम सादर केला. जीवनाचे सत्याचा शोध घेणारे, आनंद, दुःख, राग, पाश्चाताप अशा अनेक स्वभावगुणांचे वर्णन नृत्याच्या माध्यमातून करण्यात आले. तर ‘मताड बार देनो’ या नृत्य रचनेतून भगवान विष्णू यांना सोबत करण्यासाठी आळवणी करण्यात आली.
कार्यक्रमात रंजनी रामकृष्णन यांनी गायनात तर ब्रीजेश गोपालकृष्णन यांनी व्हायोलिनसाठी आणि के पी रमेशबाबू मृदंगासाठी साथसंगत केली.
त्यानंतर कथक नर्तक धीरेंद्र तिवारी यांनी नृत्य सादर केले. त्यांच्या ‘तीन तार’ या नृत्यसादारीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांचा उदंड प्रतिसाद दिला. तर त्यांनी सादर केलेल्या ‘रंगीला शंभू’ या नृत्यरचनेतून भगवान शिव यांच्या प्रेमळ रूपाचे दर्शन घडले. त्यांना आदिती गुरव (गायन), चारुदत्त फडके (तबला), यशवंत थिटे (हार्मोनियम) आणि नीलम सोलंकी यांनी सथसंगत केली.
कार्यक्रमाची संगता सांख्य डान्स कंपनी’च्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘सीझन’ या ग्रीष्म, वर्षा, शिशिर आणि वसंत अशा चार ऋतूंच्या वर्णनावर आधारित नृत्य सादरीकरणाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिता पाठक यांनी केले.
