आसामी खाद्यसंस्कृती आणि लोककलांचा होणार जागर
पुणे : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि असोमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांतील खाद्यसंस्कृती, पर्यटन आणि कलाविष्कारांचा अनुभव या महोत्सवात घेता येणार आहे. रविवार,१७ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत भारती विद्यापीठ कॅम्पस, पौड रोड येथे हा महोत्सव होणार असून यावेळी नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.
या एक दिवसीय महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून भारती विद्यापीठाचे सचिव विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम आणि भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांचीदेखील यावेळी उपस्थिती राहणार आहेत. या महोत्सवात आसामधील लोककलाकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच आसामी खाद्यसंस्कृती आणि हस्तकला प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना एकाच छताखाली विविध कलाविष्कार पाहण्यासोबतच खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे.
या महोत्सवात आसामी लोककलांचे दर्शन होणार असून आसामी लोकनृत्य, लोकगीत यांचे सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे आसामी लोककलावंत आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे विद्यार्थी या रचना सादर करतील. महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांतील खाद्य, पर्यटन आणि लोककला यांचा संगम यावेळी होणार आहे. पुणेकरांसाठीदेखील हा अनुभव वेगळा ठरणार असून नवीन कलाविश्वाची सफर यानिमित्ताने करता येणार आहे.