कौशल्य प्रशिक्षणासाठी कायमस्वरूपी ‘सेंटर ऑफ एक्सलंस’ बनविण्याचा मानस – जे.पी.श्रॉफ
पुणे : ” विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी क्रेडाई राष्ट्रीयचे नियोजित अध्यक्ष बोमण इराणी यांनी नुकताच दहा लाख रूपये निधी घोषित केला आहे. यामुळे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमास नक्कीच प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर आगामी काळात कौशल्य प्रशिक्षणासाठी कायमस्वरूपी सेंटर ऑफ एक्सलंस बनविण्याचा आमचा मानस आहे,”अशी माहिती क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष जे.पी.श्रॉफ यांनी दिली.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) आणि कन्स्ट्रक्शन स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडिया (सीएसडीसीआय) अंतर्गत हे केंद्र स्थापन करण्यात आले असून, याठिकाणी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक वीटकाम, भिंत बांधणी आणि फ्लोर टाइलिंगचे प्रशिक्षण दिले जाईल.त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी घडविले जाईल.
कुशल क्रेडाई’ने राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते ओडिशातील मोनीश कमल आणि महाराष्ट्रातील संजीव कुमार सबावथ, रौप्य पदक विजेता कान्हू साहू, लोचन महोतो, केरळमधील अथुल ई यांचा सत्कार केला. यापैकी सुवर्णपदक विजेते स्पर्धक मोनिश आणि संजीव कुमार हे ऑक्टोबर 2022 मध्ये चीनमधील शांघाय येथे होणार्या वर्ल्डस्किल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनुक्रमे ब्रिकलेइंग आणि वॉल आणि फ्लोअर टाइलिंग या प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेसाठी त्यांना रोहिम मोमीन आणि रबिथ कुन्नमपल्ली हे प्रशिक्षण देत आहेत.
यावेळी बोलताना श्रॉफ म्हणाले, ” वर्ल्ड स्किल्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जर्मनी, चीन, अमेरिका, फ्रान्स यासारख्या देशांमधील प्रतिनिधींशी सामना करण्याचा आणि स्पर्धेत पदक मिळविण्याचा अनुभव शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा आहे. अशा स्पर्धांसाठी चांगले प्रतिनिधी घडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ऑक्टोबर २०२२ मध्ये शांघाय येथे होणाऱ्या स्पर्धेत आमचे विद्यार्थी देशाचे नाव भूषवितील असा आमचा विश्वास आहे. उद्योगविश्वामध्ये उपयुक्त ठरतील असे कौशल्य प्रदान करणे, हे कुशल क्रेडाई पुणे मेट्रो’चे मुख्य उद्दिष्ट असून, अलीकडील काळात बांधकाम अभियांत्रिकी’चे ही विद्यार्थी वीटकाम, भिंत बांधणी आणि फ्लोर टाइलिंगचे प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित होत आहेत, हे आम्ही आमचे यश समजतो. संस्थेने आतापर्यंत 700 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.”