भारताची संस्कृती शिकण्यासाठी अमेरिकन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडून सामंजस्य करार

पुणे:केवळ आफ्रिका, अफगाणिस्तान या देशातीलच नाही तर अमेरिकेतील विद्यार्थ्यांनाही भारतीय संस्कृती, भाषा, नागरी जीवन याविषयी अभ्यास करता यावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडून ‘द अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेसोबत करार केला असून यामार्फत अमेरिकेतील विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारावर नुकत्याच विद्यापीठात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ.विजय खरे, अधिसभा सदस्य गिरीश भवाळकर, प्रसेनजीत फडणवीस, द अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ चे संचालक अनिल इनामदार आदी यावेळी उपस्थित होते.

या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रायोजकत्व घेण्यात येणार असून त्यांच्या खर्चाची जबाबदारी ‘द अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेची असणार आहे. पीएच.डी च्या विद्यार्थ्यांचे संलग्निकरण शुल्क, प्रवास खर्च, राहण्याची सोय असा सर्व खर्च संस्थेच्या माध्यमातून केला जाणार आहे.

पाश्चात्य देशातील विद्यार्थ्यांनी भारतीय उच्च शिक्षण घ्यावे, यातून भारतीय संस्कृती जगभरात पोहोचण्यास मदत होईल, म्हणून अशा प्रकारचा करार विद्यापीठाकडून केला जात आहे.- डॉ. विजय खरे, संचालक, आंतरराष्ट्रीय केंद्र

Leave a Reply

%d bloggers like this: