PMP – दोन नवीन बस मार्गांचे अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पीएमपीएमएल कडून जेजुरी एसटी स्टँड ते सुपे गाव व यवत ते सुपे गाव असे दोन नवीन बस मार्ग सुरू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पीएमपीएमएलच्या जेजुरी एसटी स्टँड ते सुपे गाव व यवत ते सुपे गाव या दोन नवीन बस मार्गांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
याप्रसंगी पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक राजेश रुपनवर, बीआरटी विभाग प्रमुख दत्तात्रय झेंडे, हडपसर आगार व्यवस्थापक सुभाष गायकवाड, सहाय्यक आगार व्यवस्थापक मोहन दडस यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी सुपे परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
पीएमपीएमएल कडून दि. १०/०४/२०२२ पासून मार्ग क्रमांक २१७ – जेजुरी एसटी स्टँड ते सुपे गाव व मार्ग क्रमांक २१९ – यवत ते सुपे गाव असे दोन नवीन बस मार्ग सुरू करण्यात आले. मार्ग क्रमांक २१७ – जेजुरी एसटी स्टँड ते सुपे गाव या बससेवेचा मार्ग जेजुरी एसटी स्टँड, जेजुरी रेल्वे स्टेशन, गाटेवाडी, कोऱ्हाळे फाटा, मोरगाव, कुतवळवाडी, सुपे गाव असा आहे. तर मार्ग क्रमांक २१९ – यवत ते सुपे गाव या बससेवेचा मार्ग यवत, भांडगाव, वाखारी फाटा, केडगाव चौफुला, कुसेगाव पडवी, पानमळा, सुपे गाव असा आहे.
जेजुरी एसटी स्टँड ते सुपे गाव या मार्गावर सध्या एक बस व यवत ते सुपे गाव या मार्गावर दोन बसेस धावणार आहेत. प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गांवर बसेस वाढविल्या जातील. जेजुरी एसटी स्टँड ते सुपे गाव पहिली बस सकाळी ६.३० वा. व शेवटची बस संध्याकाळी ५.४० वा. तर सुपे गाव ते जेजुरी एसटी स्टँड पहिली बस सकाळी ७.३५ वा. तर शेवटची बस संध्याकाळी ६.४० वा. आहे. तसेच यवत ते सुपे गाव पहिली बस सकाळी ६.४५ वा. व शेवटची बस रात्री ९.०० वा. तर सुपे गाव ते यवत पहिली बस सकाळी ७.०० वा. व शेवटची बस संध्याकाळी ६.१० वा. आहे. दरम्यान जेजुरी एसटी स्टँड ते सुपे गाव व यवत ते सुपे गाव या दोन्ही बससेवांचे या मार्गांवर असणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे जल्लोषात स्वागत केले.
