Friday, June 5, 2026
Latest NewsSports

ओडिशाच्या सौंदर्य कुमार प्रधानची दृष्टिहिनांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी

पुणे  :  आठव्या फेरीत अनपेक्षित आघाडी घेणाऱ्या सौंदर्य कुमार प्रधान या ओडिशाच्या खेळाडूने शेवटच्या फेरीत महाराष्ट्राच्या स्वप्निल शाह याच्याविरुद्ध बरोबरी करत ऑल इंडिया चेस फेडरेशनच फॉर ब्लाइंड आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावा हरबल्स राष्ट्रीय अंध बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. सलग सहा वर्षे राष्ट्रीय विजेता असलेला किशन गंगोली याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर महाराष्टाचा स्वप्निल शाह तिसऱ्या स्थानावर राहिला. महाराष्ट्राची मृणाली पांडे महिला गटात तर तमिळनाडूचा सॅम पेनीयल ज्युनिअर गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले.

पी वाय सी हिंदू जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस होता. स्पर्धा संपल्यावर विजेत्यांना चषक, प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. रोख बक्षिसांची एकूण रक्कम रुपये दीड लाख इतकी होती. बक्षीस समारंभास पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ आणि ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँड मास्टर अभिजित कुंटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ऑल इंडिया चेस फेडरेशनच फॉर ब्लाइंडचे महासचिव डॉ. मनीष थूल, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष विनायक पेठे, सचिव हर्षदा बावनकर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले  सावा हरबल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश कपूर, पी वाय सी हिंदू जिमखानाचे सचिव सारंग लागू आदी मान्यवर देखील बक्षीस समारंभास उपस्थित होते.

प्रधान याने आठव्या फेरीत घेतलेली अर्ध्या गुणाची आघाडी निर्णायक ठरली. शेवटच्या फेरीत त्याला विजेतेपदासाठी अर्ध्या गुणाची आवश्यकता होती आणि त्यादृष्टीने त्याने डावपेच उपयोगात आणले. स्वप्निल शहा याने त्याच्याविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले, तथापि प्रथमपासूनच बरोबरी करण्याच्या इराद्याने खेळणाऱ्या प्रधान याने त्याला अर्धा गुण स्वीकारण्यास भाग पाडले आणि आपली गुणसंख्या साडेसातवर नेत अजिंक्यपद मिळवले. उपविजेतेपद मिळवणाऱ्या किशन गंगोली या कर्नाटकच्या खेळाडूला गुजरातच्या दर्पण इनानी याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. शेवटच्या फेरीअखेर त्याला सात गुणांवर समाधान मानावे लागले.

स्वप्निल याच्याबरोबरच के. मरिमुथू (तामिळनाडू) व बी. एल. सोमिंदर (दिल्ली) यांचेही प्रत्येकी साडेसहा गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे स्वप्निल, मरिमुथू व सोमिंदर यांना अनुक्रमे तीन ते पाच क्रमांक देण्यात आले. महाराष्ट्राच्या मिलिंद सामंत व आर्यन जोशी यांनी अनुक्रमे सहावा व सातवा क्रमांक पटकाविला. त्यांचे प्रत्येकी सहा गुण झाले. पात्रा याला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तामिळनाडूच्या आर गोपी याने प्रगत गुणांच्या आधारे त्याला मागे टाकले आणि आठवे स्थान घेतले. शेवटच्या फेरीत त्याने गुजरातच्या संयम शहा याच्याविरुद्ध मिळविलेला विजय महत्त्वपूर्ण ठरला. दर्पण इनानी याला दहावा क्रमांक मिळाला.

स्पर्धेतील पहिले ५ बुद्धिबळपटू युरोपातील मॅसिडोनिया येथे होणाऱ्या आयबीसीए जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील अशी घोषणा यावेळी ऑल इंडिया चेस फेडरेशनच फॉर ब्लाइंडचे महासचिव डॉ. मनीष थूल यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading