आरोग्यविषयक चित्रपट नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज – पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर

पुणे  : ” नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी व्यावसायिक चित्रपटांप्रमाणेच आरोग्यविषयक चित्रपटदेखील मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या साथ व संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.

पी.एम.शाह फाउंडेशनच्यावतीने १० व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते ९ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. गंगाखेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पी एम शहा फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण कोठडीया, विश्वस्त डॉ.विक्रम काळुस्कर, पी एम मुनोत फाउंडेशनचे शरद मुनोत, अ‍ॅड.चेतन गांधी, सतीश कोंढाळकर आणि एनएफडीसी-एनएफएआयचे व्यवस्थापक जसबीर सिंग हे उपस्थित होते. ‘रिबर्थ’ या अवयवदान विषयावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सुरवात झाली.

डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, ” कोविड कितीही वाईट असो, त्याचा एक फायदा असा झाला की लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. आपल्याकडे कोविडच्या काळात मोर्चे, आंदोलने नाही झाले हे कोविड व्यवस्थापनातील आपले मोठे यश आहे.”

मुलांनी आरोग्यविषयक फिल्म्स पाहाव्यात, आरोग्याचे विषय समजून घ्यावेत. त्याबाबत आपल्या मित्रांना नातेवाईकांना समजावून सांगितले पाहिजे त्याचा सर्वांना फायदा होईल,” असेही डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले.

अ‍ॅड चेतन गांधी म्हणाले,” या महोत्सवासाठी जगभरातून शंभरहून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ४९ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १३ चित्रपट विविध देश आणि भाषांमधील असून ३६ चित्रपट भारतातील विविध राज्यांतील आहेत. मानसिक आरोग्य, बाललैंगिक शोषण, कोविड, महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, अवयवदान, कर्करोग, आरोग्य आणि पर्यावरण या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येत आहेत.”

चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीचे सदस्य विनय जवळगीकर, अनुजा देवधर, डॉ.लीना बोरुडे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पी एम शहा फाउंडेशन आणि फ्लेअर नेटवर्क सिस्टम्सतर्फे शहरातील विविध शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,हडपसर, चंद्रकांत दरोडे प्राथमिक विदयालय, शिवाजीनगर, ज्ञानसागर प्राथमिक विद्यालय आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालय, सांगवी या चार शाळांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले, 

Leave a Reply

%d bloggers like this: