fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

‘मंगेशी’ तून लतादीदींना स्वरांजली व मंगेशकर कुटुंबियांना सलाम –

पुणे :  युवतिमना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले… या हंसध्वनी रागातील संगीत मानापमान नाटकातील गीताने संगीत महोत्सवाच्या दुस-या दिवशीच्या दुस-या सत्राची सुरेल सुरुवात झाली. मंगेशकर कुटुंबातील पाच भावंडांच्या आवाजातील व विशेषतः लतादीदींच्या आवाजातील गीते दृकश्राव्य माध्यमाद्वारे ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. मंगेशकर कुटुंबीयांनी पुढील अनेक वर्षे रसिकांना पुरेल असा सांगीतिक खजिना ठेवला असून तो या मैफलीतून रसिकांसमोर मांडण्यात आला आणि  लतादीदींना स्वरांजली व मंगेशकर कुटुंबियांना सलाम करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान म्हणजेच दि. १० एप्रिल पर्यंत गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अकादमी ऑफ सिनेमा अँड थिएटर प्रस्तुत मंगेशी या कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाची संकल्प व लेखन – दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले. यामध्ये प्रज्ञा देशपांडे, मृण्मयी भिडे, सुरभी गौड, केतन अत्रे यांनी गायन केले. अभय इंगळे, विक्रम भट, आदित्य गोगटे, प्रसन्न बाम, अनय गाडगीळ यांनी साथसंगत केली. मास्टर दीनानाथ मंगेशकर ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सांगीतिक प्रवास देखील उलगडण्यात आला.
सुरुवातीला स्वरनिनाद कोल्हापूर तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये ये दुनिया एक दुल्हन… सुनो गौरसे दुनियावाले… या हिंदी गीतांसह उष:काल होता होता… सारखी मराठी देशभक्तीपर गीते देखील सादर झाली. स्वातंत्र्यासाठी लढणारे तरुण रक्त होते. त्याप्रमाणे आजही तरुणांमध्ये भारतमातेसाठी रक्त सळसळले पाहिजे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. स्वातंत्र्यापूर्व  काळात ‘छोडो भारत’ चळवळ करण्यात आली, आता ‘जोडो भारत’ चळवळ तरुणांनी करायला हवी, असेही गीतांमधून सांगण्यात आले.
गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत युवा कलाकार व सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading