मंडईजवळील स्वामी समर्थ मठातर्फे स्वामी प्रकटदिनानिमित्त पालखी सोहळा उत्साहात

पुणे : फुलांनी सजविलेल्या पालखीतून श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पादुकांची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. मंडई परिसरातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, बुधवार पेठ तर्फे या नगरप्रदक्षिणा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये स्वामींच्या मूर्तीला पोशाख, दागिने आणि गाभा-यात फुलांची आकर्षक आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली.

मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, बुधवार पेठच्या श्री स्वामी समर्थ मठात स्वामी प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष गजानन जेधे, खजिनदार संदीप होनराव, विश्वस्त रविंद्र शेडगे यांसह कार्यकर्ते व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

कमलेश कामठे म्हणाले, स्वामी प्रकटदिनानिमित्त रविवारी पहाटे ३ वाजता लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर प्रकट दिनाचे कीर्तन झाले. सकाळी ११ वाजता मंत्रजागर व संपूर्ण दिवसभर बेसन लाडूचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. दुपारी भजन कार्यक्रम, आरती व सायंकाळी नगरप्रदक्षिणा पार पडली. यामध्ये भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. शहराच्या मध्य भागातून ही नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.

Leave a Reply

%d bloggers like this: