Pune Crime : फुकट भाजी दिली नाही म्हणून मुलाला मारहाण, हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न
पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे. स्थानिक गुंड राजरोसपणे हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक प्रकार बालाजीनगर येथे घडला. बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथे फुकट भाजी दिली नाही, म्हणून गुंडांनी संबंधित अल्पवयीन मुलाला मारहाण करत पाया पडायला लावले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर सहकारनगर पोलीस खडबडून जागे झाले असून संबंधितांवर आता गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
मुलाला मारहाण करून पाया पडायला लावल्याचे दिसून येत आहे. हत्यारांच्या जोरावर दहशत माजवून सामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा हा प्रकार भरदिवसा घडल्यानंतरही याप्रकरणात कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. याबाबत सामान्य नागरिकांना जे दिसते ते पोलिसांना का दिसत नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात होता.
दरम्यान, हातात हत्यारे घेऊन साेशल मीडियावर दहशत पसरविणार्या तसेच भाजीचे पैसे मागितले, म्हणून पाया पडायला लावून मारहाण करणार्या त्या गुंडावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. साेशल मीडियावर व्हायरल हाेणारे काही व्हिडीओ जुने असून यापूर्वीच त्या अनुषंगाने संबंधित संशयित आरेापींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहकारनगर पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे .