यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे यंदापासून कर्तृत्ववान महिलांना यशस्विनी सन्मान पुरस्कार


कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई च्या वतीने स्त्री-शक्ती ला सलाम करण्यासाठी यंदापासून यशस्विनी सन्मान पुरस्कार सुरु करण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ही घोषणा केली.

या पुरस्कारांसाठी आजपासूनच म्हणजे २९ मार्च पासून अर्ज मागविण्यात आले असून अंतिम मुदत १ मे २०२२ ही असल्याचे सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरुप २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असून पुरस्कारार्थींची घोषणा ५ जुन २०२२ रोजी करण्यात येणार आहे. तर देशाला पथदर्शी ठरलेले महिला धोरण महाराष्ट्रात मंजूर झालेल्या दिवशी म्हणजे २२ जुन रोजी हे पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पुरस्करांमध्ये कृषी क्षेत्रासाठी ‘यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार’ नावाने दिला जाणार असून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकरी महिलेची निवड करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार ‘यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार’ या नावाने ओळखला जाईल. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या महिलेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात येईल. तर औद्योगिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी उद्योजिका सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

सामाजिक क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करुन महाराष्ट्राच्या विकासात भर टाकणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. याबरोबरच पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारास ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

या पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या http://www.chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेबसाईटवरच गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
९४०४७६४१७६ या मोबाईल क्रमांकावर किंवा women@chavancentre.org या इमेलवर संपर्क साधावा.


महिलांना केवळ पुरस्कार देऊन आमची जबाबदारी संपणार नाही, तर संबंधीत महिलांनी त्या त्या क्षेत्रात जे कार्य केले आहे, ते पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातून नव्या पिढीला ऊर्जा मिळेल. एक प्रकारचे मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी त्या त्या महिलांचे कर्तृत्व समाजासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातल्या अशा कर्तृत्ववान लेकींचा सन्मान करण्याची संधी आम्हाला द्यावी, ही विनंती.
खा. सुप्रिया सुळे
कार्याध्यक्ष – यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.

Leave a Reply

%d bloggers like this: