‘नवा शुक्रतारा’तून अरुण दातेंच्या आठवणींना उजाळा
नव्या पिढीतील प्रसिद्ध गायक-संगीतकार मंदार आपटे आणि जागतिक भावगीत स्पर्धेची विजेती वर्षा जोशी यांनी अरुण दाते यांनी गायलेली भावगीते सादर केली. अभिनेत्री अनुश्री फडणीस यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले व स्वतः अतुल अरुण दाते यांनी अरुण दाते यांच्या जीवनाशी निगडित अनेक रम्य आठवणींना यावेळी उजाळा दिला.
‘श्रीराम जयराम’ या गाण्याने मंदार यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘मोहुनिया तुजसंगे’, ‘स्वरगंगेच्या काठावरती’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘लाजून हासणे अन्’, ‘तुला पाहिले मी’, ‘जपून चाल’, ‘या जन्मावर’ ही गीते मंदार यांना गायली. तर वर्षा जोशी यांनी ‘लपविलास तू’, ‘घननिळा लडिवाळा’, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो’, ‘सर्वस्व तुजला वाहोनी’ ही गीते सादर केली. या दोन्ही गायकांच्या बहारदार सादरीकरणाने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. वर्षा आणि मंदार यांनी एकत्रित ‘पहिलीच भेट झाली’, ‘संधिकाली या अशा’, ‘श्रीरंग सावळा’, ‘डोळे कशासाठी’ आणि ‘शुक्रतारा मंदवारा’ ही गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘भातुकलीच्या खेळामधले’ हे गीत १९७८ मध्ये बीबीसी लंडन येथे प्रदर्शित करण्यात आले होते हा व्हीडिओदेखील यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आला. तसेच यशवंत देव आणि मंगेश पाडगावकर यांच्याशी संबंधित काही दुर्मिळ व्हीडिओदेखील प्रेक्षकांना दाखविण्यात आले.
सागर टेमघरे (की-बोर्ड), दीप्ती कुलकर्णी (संवादिनी), अमित कुंटे (तबला), असिफ खान (ऱ्हिदम मशिन) यांनी साथसंगत केली. ध्वनी व्यवस्था प्रशांत कांबळे आणि सहकारी यांची तर दृकश्राव्य व्यवस्था सायली सोनटक्के यांची होती.