पुणे शहरात सर्वत्र समान पाणी मिळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : खडकवासला धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन नवा मुठा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह अजून एक उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. पुणे शहरातही महानगरपालिकेने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन सर्वत्र समान पाणी मिळेल, कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

खडकवासला प्रकल्पांची कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, समाधान आवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे आदी उपस्थित होते.

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा २.५ टीएमसी पाणी कमी आहे, अशी माहिती बैठकीत यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी, परंतु सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे. पुणे महानगरपालिकेने पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.

पवार पुढे म्हणाले, भामा आसखेड प्रकल्पाचे पुणे शहरासाठी निश्चित केलेल्या पाण्यापैकी दैनंदिन सुमारे ७५ एमएलडी पाणी उचलले जात नाही. ते पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी पाईपलाईन, पंपींग स्टेशन आदी कामे गतीने पूर्ण करावीत, जेणेकरुन खडकवासला प्रकल्पावरील तेवढा ताण कमी होईल. महानगरपालिकेने १०० टक्के पाणी मीटर बसवणे, बेकायदेशीर नळजोड तोडण्यासह त्यावर कठोर कारवाई करणे यावर विशेष भर द्यावा. दक्षिण तसेच पूर्व पुणे भागात पाण्याच्या अडचणींबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घ्यावीत तसेच सुरू असलेली कामे गतीने आणि चांगला दर्जा राखून पूर्ण करावीत. नवीन पाणीपुरवठा योजना, पाईपलाईन आदी कामे हाती घेताना ही कामे तुकडे (पॅकेजेस) करुन केल्यास एकाच वेळी कामे सुरू होऊन लवकर पूर्ण होतील, असेही पवार म्हणाले.

आमदार चेतन तुपे यांनी खराडी ते साडेसतरा नळी पाईपलाईनद्वारे भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी उचलण्याचा पर्याय सुचवला. त्यावर याबाबत व्यवहार्यता, तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना त्यांनी महानगरपालिकेला दिल्या. आमदार तापकीर यांच्या मागणीनुसार शहरात नवीन समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अतिरिक्त पंप ठेवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

सध्या राज्यात विजेची मागणी प्रचंड वाढलेली असून नुकतीच २४ हजार मेगावॅटपर्यंत गेली आहे. भविष्यातही ही मागणी वाढण्याची शक्यता असून अतिरिक्त वीज उपलब्ध करुन घेण्यासाठी एनटीपीसीकडून तसेच नॅशनल ग्रीडमधून वीज घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि, भविष्यातही वीजेच्या समस्येला गृहीत धरुन पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: