Friday, June 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

झी महागौरव २०२२ म्हणजे कला, नृत्य आणि मनोरंजनाचा महासंगम

दोन दशकांहूनही जास्त काळ झी मराठी हि वाहिनी प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आली आहे. मराठी भाषा आणि मराठी नाटक चित्रपटांसाठी झी मराठी गेली २१ वर्ष कटिबद्ध आहे. मराठी नाटक चित्रपटांचा गौरव झी मराठी वाहिनी हि आवर्जून करते आणि यंदाचा झी गौरव हा विशेष आहे कारण या पुरस्कार सोहळ्यात गेल्या २१ वर्षातल्या, २१ महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करण्यात आला. हा महागौरव सोहळा म्हणजे प्रेक्षकांची मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
झी महागौरव या पुरस्कार सोहळ्यात गेल्या २१ वर्षातील सिनेमामधील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शकांचा यांचा केलेला गौरव प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सैराट, जोगवा, आटपाडी नाईट्स, बिनधास्त, मृगजळ, एक होती वाडी, भेट, श्वास, उत्तरायण, आम्ही असू लाडके, मिशन चॅम्पियन, एवढंसं आभाळ, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आईचा घो, शाळा, बालक पालक, अवताराची गोष्ट, एलिझाबेथ एकादशी, मुरंबा, नाळ, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये चुरस रंगली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जोगवा सिनेमासाठी मुक्ता बर्वेची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून उपेंद्र लिमये (सिनेमा-जोगवा) आणि सुबोध भावे (सिनेमा-कट्यार काळजात घुसली) यांना पुरस्कार विभागून देण्यात आला तर नागराज मंजुळेला सैराट सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिध्द अभिनेते सचिन पिळगांवकर यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा (सिनेमा-कट्यार काळजात घुसली) पुरस्कार मिळाला. या सगळ्या चित्रपटांमधून सर्वोत्तम चित्रपट निवडणे हे काही सोपं नव्हतं, त्यामुळे कुठला चित्रपट सर्वाधिक पुरस्कार पटकावून महागौरवचा सन्मान पटकावतो याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
याच सोबत या पुरस्कार सोहळ्यात मनोरंजनाचा धमाका असणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि अमृता खानविलकर यांचा पुष्पा आणि सैराट या सुप्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यांवरील धमाकेदार नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. झी गौरवचं गाणं हे रसिक-प्रेक्षकांच्या ओठावर रूळलेलं आहे. हे गाणं ऐकल्यावर एक वेगळाच जोश अंगात संचारतो आणि याच गाण्यावर कोरिओग्राफर मयूर वैद्य आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे दोघे २ वेगळ्या शैलीच्या नृत्याचा संगम सादर करणार आहेत. तसेच चला हवा येऊ द्या मधील विनोदवीर हे प्रेक्षकांना त्यांच्या भन्नाट विनोदी स्किट्सने खळखळून हसायला भाग पाडतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading