विद्यार्थ्यांनी उद्योगाभिमुख मानसिकता विकसित करावी – प्रतापराव पवार

पुणे : “उद्योगात सातत्य, चिकाटी, गुणवत्ता, वेगळेपण आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. व्यावसायिक यशात जोखीम पत्करणे, अपयश पचवणे या गोष्टी महत्वपूर्ण ठरतात. अपयश आले तरी पुन्हा जोमाने व्यावसायिक वाटचाल करण्याची जिद्द असायला हवी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्योगाभिमुख मानसिकता विकसित केली पाहिजे,” असे मत ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने स्थापण्यात आलेल्या उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन प्रतापराव पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त तुषार रंजनकर, सुप्रिया केळवकर, रत्नाकर मते, दिनकर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या प्रायोगिक व्यवसायाचे सादरीकरण व प्रदर्शन लावण्यात आले होते.

प्रतापराव म्हणाले, “मलाही उद्योग सुरु करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकदा अपयश आले, चुका झाल्या. पण त्यातून शिकत गेलो. चुकांमधून आपल्याला उद्योगाची दिशा कळते. धाडस आणि जोखीम पत्करण्याची वृत्ती असेल, तर आर्थिक पाठबळ नसतानाही उद्योग उभारता येतो. आपल्यातील कल्पकता, नाविन्य आणि परिश्रम करण्याची तयारी आपल्याला यशस्वी उद्योगाकडे घेऊन जाते. समितीच्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून घेत उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे.”
तुकाराम गायकवाड म्हणाले, “समितीतून उद्योजक तयार होण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. विद्यार्थी विकासाबरोबरच उद्योजकता विकास यावर पुढील काळात भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या वास्तव्यात जागरूकता, ज्ञानसत्र, प्रशिक्षण व उद्योग उभारणीसाठी निधी देण्याच्या मानस आहे. समाजातील उद्योजक, माजी विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे.”
तुषार रंजनकर यांनी उद्योजकता विकास केंद्राची कल्पना, त्याचे स्वरूप व भविष्यातील वाटचाल याविषयी विस्तृत माहिती दिली. समितीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केलेल्या नवनाथ जगताप व सुधीर गंगावणे या नवउद्योजकांनी मार्गदर्शन केले. महेश सांगळे याने संयोजन केले. शीतल सराटे हिने सूत्रसंचालन केले. आभार वैष्णवी शिरोडे हिने मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: