महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास लिहिण्याची गरज – डॉ. सदानंद मोरे

पुणे: महाराष्ट्राचा इतिहास राजकीय पद्धतीने राजकारण करण्यासाठी अनेकदा रचला गेला आहे. मात्र सत्याच्या आधारावर महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास लिहिण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्रातील संतसाहित्यपासून ते आधुनिक महाराष्ट्राचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर अध्यासन, संत तुकाराम अध्यासन व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ विचारवंत व महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे व्यासंगी संशोधक-अभ्यासक प्राध्यापक सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, प्रा. राजा दीक्षित, डॉ दिलीप धोंडगे आणि डॉ रमेश वरखेडे हेही उपस्थित होते.

जून २०२२ मध्ये मोरे सर वयाच्या एक्काहत्तरीत प्रवेश करणार आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्राविषयीच्या त्यांच्या संशोधकीय मांडणी व साहित्यावर विविधांगी चर्चा व्हावी या उद्देशाने ‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘गर्जा महाराष्ट्र’ आणि आगामी ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ या त्यांच्या चार ग्रंथांवर ‘महाराष्ट्र चतुष्टय’ हे चर्चासत्र व डॉ. मोरे यांची मुलाखत अश्या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा.अभय टिळक, डॉ.प्रभाकर देसाई, डॉ.रूपाली शिंदे व सचिन परब यांनी डॉ. मोरे यांची मुलाखत घेतली.

डॉ. मोरे म्हणाले, सध्याच्या अत्याधुनिक जाणिवेला तुकोबांचा संदर्भ आहे. तुकारामांचे साहित्य हे सामान्य माणसाच्या जगण्याशी निगडित आहे. माझ्या आजच्या जगण्याचे संदर्भ मला इतिहासात सापडतात म्हणून मी इतिहासात रमतो. पण इतिहासाच्या या प्रवासात ओझं काय आणि आवश्यक काय हे आपण डोळसपणे समजून घ्यायला हवं. केवळ एक धागा न पकडता परिस्थितीचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संदर्भांचं अंतरविद्याशाखीय भान नव्या पिढीने ठेवायला हवं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मोरे पुढे म्हणाले, वारकरी संप्रदाय हा आजही परंपरेने चालत आलेल्या प्रथेने चालतो आहे. समतेचं खूप मोठं मूल्य त्यांच्याकडे आहे त्याची जाणीव त्यांना नाही. ही जाणीव प्रार्थना समाज, समता परिषद या ठिकाणी दिसते.

Leave a Reply

%d bloggers like this: