एस. बालन करंडक – केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जिनवानी इलेव्हन संघांची विजयी सलामी 

पुणे :  पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि जिनवानी इलेव्हन संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत वैभव विभुते याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने विझार्डस् इलेव्हन संघाचा २ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना विझार्डस् इलेव्हन संघाने ११४ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये आदित्य गजभिये (३६ धावा) आणि रत्नदीप लोंढे (२० धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या वैभव विभुते याने नाबाद ३९ धावा आणि आकाश पाटील २३ धावा करत संघाला अखेरच्या षटकामध्ये विजय मिळवून दिला.

हिरा चौधरी याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर जिनवानी इलेव्हन संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा १० गडी राखून एकतर्फी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीला  २० षटकामध्ये ९४ धावाच करता आल्या. अजिंक्य अनारसे (२१ धावा), सार्थक चाकुरकर (१५ धावा) आणि रवि चौहान (१४ धावा) यांनी छोट्या खेळी केल्या. जिनवानी संघाच्या हिरा चौधरी १५ धावात ३ गडी टिपले. जिनवानी इलेव्हनने हे आव्हान १० षटकामध्ये पूर्ण केले. हिमांशु अगरवाल (नाबाद ५० धावा) आणि नितिश सप्रे (नाबाद ३९ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: