२८ वर्षांत प्रथमच पुणे विद्यापीठ अंतिम फेरीत

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या २८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेतेपदासाठी त्यांची गाठ आता माजी विजेत्या संबलपूर विद्यापीठ संघाशी पडणार आहे.

एसएनबीपी संस्थेने ही २८वी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा पुरस्कृत केली असून, हॉकी इंडियाच्या सहकार्याने अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुण्यात पिंपरीतील नेहरुनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुणे विद्यापीठ संघाने पिछाडीवरून वीर बहादूर सिंग पूर्वांचल (व्हीबीएसपी) विद्यापीठ संघाचा शूट आऊटमध्ये ४-३ असा पराभव केला. नियोजित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता.

स्पर्धेच्या २८ वर्षाच्या इतिहासात पुणे विद्यापीठ संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला. स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पुणे विद्यापीठ संघ पश्चिम विभागातील दुसराच संघ ठरला. यापूर्वी भोपाळच्या जवाहरलाल नेहरु पीजी कॉलेज संघाने (२००७, २००८, २०१०, २०१३) चार वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यांनी २०१३ मध्ये विजेतेपद मिळविले होते.

समान ताकदीच्या संघातील लढत सुरवातीपासून बचावात्मक वाटली. मात्र, संधी मिळताना व्हीबीएसपी संघाने आपल्या आक्रमणांनी पुण्याच्या खेळाडूंवरील दडपण वाढवले. सामन्याच्या १७व्या मिनिटाला चालीत त्यांना मिळालेला पेनल्टी कॉर्नर वेजेंद्र सिंग याने सत्कारणी लावताना संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांकडून फार काही वेगवान खेळ झाला नाही. त्यामुळे मध्यंतराला व्हीबीएसपी संघाने १-० अशी आघाडी राखली.

त्यानंतर उत्तरार्ध तुलनेने वेगवान झाला. उत्तरार्धाच्या सुरवातीलाच म्हणजे ३६व्या मिनिटाला अमित यादव याने व्हीबीएसपी संघाची आघाडी वाढवली. पुणे संघाने यावेळी धारदार प्रतिआक्रमण करताना त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सामन्याच्या ४०व्या मिनिटाला वेंकटेश केंटे याने पुण्याचा पहिला गोल केला. त्याने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर व्हीबीएसपीचा गोलरक्षक प्रतिक निगमला चकवले. या एका गोलने पुण्याच्या खेळाडूंमध्ये कमालीचा आत्मविश्वास आला. त्यांची आक्रमणे वाढू लागली. पण, योगेश बोरकरला गोल करण्याची सुवर्ण संधी साधता आली नाही. त्यानंतर व्हीबीएसपी संघाच्या खेळाडूंनी देखिल गोल करण्याची संधी मिळविण्याची धडपड सुरू केली. अशीच एक संधी त्यांना चालून आली. पुण्याचा गोलरक्षक शिवाजी गायकवाड पुढे आला होता. मात्र, व्हीबीएसपी संघाच्या दिव्यांश शक्ती वर्मा याला ही संधी साधता आली नाही. सामन्याच्या ५१व्या मिनिटाला पुणे विद्यापीठ संघाच्या रोहन पाटिल याने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना सामना २-२ असा बरोबरीत आणला.

शूट आऊटमध्ये तालेब शाह, हरिष शिंदगी, गणेश पाटिल, रईस मुजावर यांनी अचूक गोल केले. व्हीबीएसपीच्या अनुज सिंग, अरुण शहानी, वेंजेंद्र सिंग यांनाच गोल करण्यात यश आले. शूट आऊटमध्ये पुण्याने पहिला प्रयत्न केला. पण, रमेश पिल्लेला गोलव करण्यात अपयश आले. त्याचवेळी व्हीबीएसपीसाठी सकिब मेवाती आणि कर्णधार उत्तम सिंग यांना गोल करता आले नाहीत.

दुसऱ्या उपांकत्य सामन्यात संबलपूर विद्यापीठ संघाने लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ संघाचे आव्हान ३-२ असे संपुष्टात आणले. कमालीच्या वेगवान झालेल्या पूर्वार्धातच सामन्यातील पाचही गोलची वर्णी लागली.

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला नविन कुजुर याने संबलपूरसाठी पहिला गोल कोला. त्यानंतर मतियास डंग याने २५ आणि २६व्या अशा लागोपाठच्या मिनिटाला गोल करून संबलपूरची आघाडी भक्कम केली. मात्र, पूर्वार्धातल्या अखेरच्या टप्प्यात २८व्या मिनिटाला बलकर सिंग आणि ३०व्या मिनिटाला अराजित सिंग यांनी गोल करून पिछाडी भरून काढली. त्यानंतर उत्तरार्धात संबलपूरने आपली आघाडी भक्कम राखण्याच्या दृष्टिने बचावात्मक खेळ केला.

Leave a Reply

%d bloggers like this: