‘मी वसंतराव’चा ट्रेलर प्रदर्शित !
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘मी वसंतराव’ हा सुरांची सांगितिक मैफील असलेला चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘मी वसंतराव’ या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा नुकताच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, राहुल देशपांडे, अनिता दाते, सारंग साठ्ये, कौमुदी वालोकर, अमेय वाघ यांच्यासह सुबोध भावे, हृषिकेश जोशी, जितेंद्र जोशी आदी कलाकार उपस्थित होते.
अभिनेते नाना पाटेकर ‘मी वसंतराव’च्या ट्रेलर लाँच निमित्ताने म्हणाले, ” पु. ल. देशपांडे म्हणायचे, मोठी माणसं जात नसतात. ती संगीत रूपानं चिरंतन राहतात. हे वाक्य वसंतरावांच्या बाबतीत तंतोतंत जुळतं. वसंतरावांना भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी अशा सगळ्याच प्रकारची गायकी यायची. गायकी त्यांच्या नसनसात भिनलेली होती. त्यांचा साहित्याचा अभ्यासही अफाट होता. मी वसंतरावांना भेटलो आहे. त्यांच्या सान्निध्यात आल्यानं एक व्यक्ती म्हणून मला त्यांना जवळून अनुभवता आले.”
‘मी वसंतराव’च्या प्रवासाबद्दल राहुल देशपांडे म्हणतात, ”आपण स्वतःचा जितका चहुबाजूनं शोध घेऊ, तितकं आपण समृद्ध होतो. याचा अनुभव मला ‘मी वसंतराव’ करताना आला. या प्रवासात एक कलाकार आणि मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी वृद्धिंगत झालो. आजोबा आणि त्यांची गायकी हा माझ्यासाठी मुळात जिव्हाळ्याचा विषय. मला आजोबांचा सहवास जास्त लाभला नाही. मात्र आजीकडून, आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींकडून मला त्यांना समजून घेता आलं. त्यांची गाणी ऐकली, रेकॉर्डिंग्स पाहिले. त्यातील बारकावे, हावभाव याचा मी अभ्यास केला.”
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ”मी आणि राहुलने पाहिलेलं हे स्वप्न आहे, आज नऊ वर्षांनी प्रत्यक्षात उतरत आहे. पहिल्यांदाच मी बायोपिक या प्रकारचा चित्रपट बनवत आहे. एखादी प्रसिद्ध व्यक्तिरेखा पडद्यावर दाखवणं निश्चितच सोपं नसतं, ही प्रक्रिया खूप आव्हानात्मक असते.
राहुलने घेतलेली मेहनत आपल्याला आतापर्यंत दिसली आहेच. पण अमेय वाघ (दीनानाथ मंगेशकर), पुष्कराज चिरपुटकर (पु. ल. देशपांडे), अनिता दाते (वसंतरावांची आई), कौमुदी वालोकर (वसंतरावांची पत्नी) दुर्गा जसराज (बेगम अख्तर) यांच्यासह सगळ्याच कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करून त्यांना योग्य न्याय दिला आहे.”
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे.
