बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना आहे. जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.   अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे, 27 मे 2022 रोजी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशी माहिती प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला जगभरातील प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील संवाद आणि जबरदस्त ऍक्शन सिक्वेन्समुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत उत्कंठा वाढली आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेलं एकमेव सरसेनापती होते. या चित्रपटात मराठीतील ‘हँडसम हंक’ अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत. याशिवाय अनेक दिगग्ज कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

संदीप मोहिते पाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: