कोणताही आरोप नसताना माझ्या वडीलांना आणि काकूला तुरूंगात ठेवले – देवेंद्र फडणवीस
मुंबई : पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. फडणवीस यांची प्रश्नावली बदलण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. फडणवीस म्हणाले, ‘मला पाठवण्यात आलेली प्रश्नावली आणि काल मला विचारण्यात आलेले प्रश्न हे वेगळे होते. कालचे प्रश्न पाहिल्यावर मला याला राजकीय रंग देण्यात आल्यासारखे वाटले. प्रश्न कुठे बदलले आणि कुणी बदलले हे मला माहीत आहे. पण मी कोणत्या घरातून येतो हे माहीत आहे का? इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवले होते. त्यामुळे मी तुरूंगाला घाबरत नाही’, असेही फडणवीस म्हणाले.
याबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत एक स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर देताना फडणवीसांना या प्रकरणात गोवण्याचा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर फडणवीस बोलत होते.
फडणीस म्हणाले, कालचे प्रश्न पाहिल्यावर याला राजकीय रंग देण्यात आल्यासारखे वाटले. मला पाठवण्यात आलेली प्रश्नावली ही साक्षीदाराची होती. तर काल विचारण्यात आलेले प्रश्न हे आरोपी सारखे विचारण्यात आले. या प्रकरणात सहआरोपी करता येते का? या उद्देशाने ते प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न कुठे बदलले आणि कुणी बदलले हे मला माहीत आहे. मी कोणत्या घरातून येतो हे माहीत आहे का? इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवले. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवले. त्यांनीही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही तुरूंगाला घाबरणारे नाही. आम्ही भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवताच राहणार.