जेव्हा लोक विषमुक्त अन्न खातील तेव्हा माझं स्वप्न पूर्ण होईल – राहीबाई पोपेरे

पुणे  : ” स्वदेशी बियाणांचे वाण जपले, म्हणून सर्वांकडून माझे कौतुक होत आहे. पण माझे काम प्रत्येक घरापर्यंत पोहचावे ही माझी इच्छा आहे. प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न, भाजीपाला आला पाहिजे. जेव्हा लोकं विषमुक्त अन्न खातील तेव्हा माझं स्वप्न पूर्ण होईल,” अशी भावना पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली.

युनायटेड वेस्टर्न बिझनेस फोरम या लघु आणि मध्यम उद्योजकांच्या संस्थेतर्फे बीजमाता अशी ओळख असलेल्या आणि भारत सरकारतर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आलेल्या राहीबाई पोपेरे यांना भारताचे इथेनॉल मॅन अशी ओळख असलेले आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रमोद चौधरी यांच्या शुभहस्ते ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.एस. एम पठाण, हिंजवडी गावचे संरपंच विशाल साखरे,  फोरम’चे नवनाथ गायकवाड,  मुकेश फरांदे, मिलिंद महाजन, ऋतुजा कपडेकर, योगिता तरार, हरिश चौंहान, अमोल इवारकर उपस्थित होते. यावेळी फोरमच्या महिला सदस्यांतर्फ़े राहीबाई यांचा वाण आणि साडी देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास सिल्व्हर लाईन इलेक्ट्रिकल्स, क्राउन कन्सेप्ट क्रिएटिव्ह ब्रँड्स आणि श्रीक्रिशना इन्व्हायमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांचे सहकार्य लाभले होते.

या वेळी बोलताना  राहीबाई म्हणाल्या,” देशी बियाणे आणि रसायनमुक्त शेती ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केवळ शेतीमध्ये सेंद्रिय उत्पादन घेता येते असे नाही. तर नागरिक घरामध्ये मोठ्या कुंड्या लावून, टेरेसवर अथवा शाळेच्या आवारातही भाजीपाला पिकवू शकतात.” सर्वांनी बिया लावल्या पाहिजे. प्रत्येक शेतात परसबाग आणि प्रत्येक घरात भाजीपाला आला पाहिजे. प्रत्येक मुलांच्या डब्यात ताजा भाजीपाला आला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मोठ्या प्रमाणात लोकं आता माझ्याकडे बी नेण्यासाठी येतात. या उपक्रमात आसपासच्या छोट्या गावातील ३००० हून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत तसेच दहा गावांमध्ये शेतकरी शेती करतात. कमिटीच्या माध्यमातून 300 जाती तयार केल्या गेल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

प्रमोद चौधरी म्हणाले,” जगभर हायब्रीड की सेंद्रिय हा विषय वादाचा मुद्दा बनला आहे. हायबीड मध्ये उत्पादन जास्त मिळते पण त्याचा हळूहळू का होईना आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सेंद्रिय उत्पादनाबाबत जागरूकता कमी आहेत. ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे. त्यासाठी आणखी काही संस्थानी पुढे येऊन राहीबाईंचे काम पुढे नेले पाहिजे.”

Leave a Reply

%d bloggers like this: