राज्यपालांना भेटायला गेलो तेव्हा बडबडे ज्योतिषी आहेत की काय असंच वाटलं – राज ठाकरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वर्धापन दिन आज पुण्यात साजरा झाला.  दरवर्षी मुंबईत होणारा वर्धापन दिन पुण्यात पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली. कोरोनाच्या काळात एकही सभा झाली नव्हती त्यामुळे पहिलंच भाषण असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी अनेकांचा समाचार घेतला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांनी टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो तेव्हा बडबडे ज्योतिषी आहेत की काय असंच वाटलं. मला वाटलं की, हातात हात घेऊन भविष्य बघायला लागतील असं वाटलं.

कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता. त्यांच्या वक्तव्याबद्दल राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, तुम्हाला काय कळतं का? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले माहिती आहेत का? आपला काही संबंध नसताना नुसतं बोलायचं. अशी टीका केली.
रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याच्या चर्चेवरूनही राज ठाकरे यांनी भाषणात समाचार घेतला. ते म्हणाले की, ना छत्रपतींनी सांगितलं कधी रामदास स्वामी त्यांचे गुरु असल्याचं सांगितलं, ना रामदास स्वामींनी ते शिवाजी महाराजांचे गुरु होते असं सांगितलं. फक्त भांडणं लावायची, एकाची विदवत्ता कमी करायची आणि एकाचं शौर्य कमी करायचं इतकंच चालल्याचं राज ठाकरें म्हणाले.

रामदास स्वामींनी छत्रपतींबद्दल लिहलंय ते मी घरात लावलंय. रामदास स्वामींनी छत्रपतींबद्दल जे लिहिलंय तेवढं चांगलं आजतागायत मी वाचलं नाही. यासाठी निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। हे वाचा असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.
राज्यपालांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या टीकेचा समाचार घेताना कोश्यारींची नक्कलही राज ठाकरे यांनी केली. तसंच ते म्हणाले की,परवाच्या भाषणात कोणीतरी राज्यपालांचे महात्मा फुलेंबद्दल बोललेलं दाखवलं. ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंबद्दल ते बोलले. अहो तेव्हा लहानपणी व्हायची लग्नं, तुमचं अजून नाही झालं. नको तिथं बोटं घालायची सवय कळत नाही मला. बाकीचे आहेतच मग, तुम्हाला काय वाटतं? असं विचारत सुटतात. आम्ही येडे परत सगळे सुटतो असंही राज ठाकरें म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: