कविता ही क्षणजीवी असते – प्रा. नीला बोरवणकर

पुणे शांतक्षणी भावनांचा झालेला उद्रेक म्हणजे कविता. कविता ही क्षणजीवी असते. एका क्षणात ती जन्म घेते आणि यातूनच कवी निर्माण होतो. अनायास हा काव्यसंग्रहदेखील याचीच एक फलश्रृती आहे, असे मत डॉ. नीला बोरवणकर यांनी व्यक्त केले. ‘अनायास’ काव्यसंग्रह प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या आवारात रेखा मंत्री आणि रवी काबरा यांच्या ‘अनायास’ या हिंदी काव्यसंग्रहाचे प्राध्यापिका डॉ. नीला बोरवणकर आणि उद्योजक प्रकाश राठी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर प्राध्यापिका डॉ. नीला बोरवणकर आणि उद्योजक प्रकाश राठी यांच्या हस्ते ‘अनायास’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. उद्योजक प्रकाश राठी यांनी हिंदी साहित्यातील मातब्बर कवींचे दाखले देत ‘अनायास’मधील कवितांवर भाष्य केले. यानंतर आनंद करवा यांनी कवयित्री रेखा मंत्री आणि कवी रवी काबरा यांच्याशी संवाद साधला. काव्यसंग्रहाविषयी बोलताना रवी काबरा म्हणाले, ‘अनायास’ म्हणजे सहज घडलेली घटना किंवा गोष्ट. हा काव्यसंग्रह देखील असाच घडला. रेखा मंत्री आणि माझ्या काही निवडक कवितांचे प्रकाशन करण्याचा विचार मनात आला आणि आम्ही हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

काव्यसंग्रहाविषयी मत व्यक्त करताना रेखा मंत्री म्हणाल्या, माझी पहिली कविता ही मराठी भाषेत लिहिली होती. त्यानंतर मी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये कविता रचल्या. मनात एखादा विचार आला की तो शब्दबद्ध होतो आणि यातूनच कविता तयार होते. या काव्यसंग्रहामध्ये रवी काबरा आणि मी लिहिलेल्या अशाच काही निवडक कविता रसिकांना वाचायला मिळणार आहे.

या काव्यसंग्रह विक्रीतून मिळालेला निधी गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे. यावेळी काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन करण्यात आले. तसेच काव्यसंग्रहाबद्दल अनेक आपले अभिप्राय नोंदवले. कार्यक्रमाचे निवेदन अनुपमा काबरा यांनी केले. राजेंद्र मंत्री यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: