fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

थकबाकी वसूल करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून महापालिकेला १४४.३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले

पुणे : निवासी मिळकतींची थकबाकी वसूल करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून महापालिकेला १४४.३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. त्याचसाठी मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली. यावेळी केवळ निवासी मिळकतींसाठी ही योजना होती. ही योजना ७ जानेवारी ते २६ जानेवारी आणि ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत मिळकतकर विभागाने राबविली होती, अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

यामध्ये ६६ हजार ५०० थकबाकीदारांनी १४४ कोटी ३५ लाख रुपयांचा कर महापालिकेला भरला आहे. या योजनेअंतर्गत दंडाच्या रक्कमेवर ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. ही सवलतीची रक्कम ६५ कोटी ६८ लाख रुपये इतकी आहे. अभय योजनेची मुदत संपलेली असल्याने १ मार्च पासून आता पुन्हा दरमहा २ टक्के शास्ती लावली जात आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाने यंदा विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. १ एप्रिल २०२१ ते ३ मार्च २०२२ या कालावधीत १६०६ कोटी १८ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. ८ लाख ८० हजार मिळकतींमधून हा कर जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये १४३३ कोटी ३ लाख रुपये जमा झाले होते. यंदा हा आकडा सुमारे पावणे दोनशे कोटींनी जास्त आहे. असे कानडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading