विज्ञानातील गमतीजमती जाणून घेत तिसरे ‘जाधवर सायन्स फेअर’ उत्साहात

पुणे : सौर उर्जा, वाहतूक समस्या, महामारींवरील लसीकरण यांसह अत्याधुनिक आणि पारंपरिक विज्ञानप्रयोगांच्या विविध मॉडेल्समधून विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक गमतीजमती जाणून घेतल्या. नाविन्यपूर्ण प्रतिकृतींमधून बालविज्ञानप्रेमींनी पुणेकरांसमोर अनोखे विज्ञानविश्व उलगडले.

नऱ्हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे संस्थेच्या प्रांगणात तिस-या जाधवर सायन्स फेअर अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हवामान शास्त्रज्ञ रवी यादव, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, पालकवर्ग आदी देखील उपस्थित होते. प्रदर्शनात १०० हून अधिक प्रकल्पांचा समावेश होता. अगदी इयत्ता २री ते ९वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात प्रकल्प सादर करीत उत्साहाने सहभाग घेतला.

रवी यादव म्हणाले, विज्ञान क्षेत्रातील अनेक विद्यार्थी पदवी घेतल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. फार कमी विद्यार्थी पुन्हा वैज्ञानिक क्षेत्रात येण्याचा विचार करतात. विज्ञानाचे क्षेत्र विस्तृत असून विद्यार्थी त्याकडे करिअर म्हणून पाहू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांमधील विज्ञानबद्लचे कुतूहल निर्माण व्हावे आणि त्यांच्यातील संशोधन वृत्तीस देखील चालना मिळावा, याकरीता हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ देत त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जातो. विद्यार्थीदशेतच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, याकरीता असे उपक्रम वारंवार राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्या बिडकर यांनी प्रास्ताविक केले. वहिदा कळसकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. रेखा भांगे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: