केवळ सशस्त्र दलांना सेवा देण्यासाठी ‘उडचलो’चा रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश
नवी दिल्ली : केवळ भारताच्या सशस्त्र दलांना सेवा देणाऱ्या ‘उडचलो’ या कन्झ्युमर टेक कंपनीने आता रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केला आहे. कंपनीने याबाबतची घोषणा आज केली. संरक्षण खात्यातील आजी व माजी कर्मचारी आता ‘उडचलो’च्या माध्यमातून सवलतीच्या बाजारभावात परवडणारी घरे खरेदी करू शकतील. ‘‘उडचलो अॅश्युरिटी’ अशी हमी या ब्रँडतर्फे देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘उडचलो’द्वारे होणारी रिअल इस्टेटची सर्व खरेदी ही गुणवत्तापूर्ण, परवडणारी व फायदेशीर असणार आहे. संरक्षण खात्याचे कर्मचारी आता ‘उडचलो’च्या माध्यमातून वास्तविक बाजारभावापेक्षा किमान १० टक्के सवलतीत मालमत्ता खरेदी करू शकतील.
सशस्त्र दलांचे प्राधान्य असलेल्या सर्व शहरांमध्ये हा उपक्रम सादर करण्यात येत आहे. यांमध्ये सर्वप्रथम पुणे शहरात ही सेवा देण्यात येईल आणि त्यानंतर चंडीगढ, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू आणि जयपूर यांसारख्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याचे नियोजन ‘उडचलो’चे आहे.
पुणे शहरासाठी ‘उडचलो’ने प्रख्यात ‘न्याती डेव्हलपर्स’शी हातमिळवणी केली आहे. या विकसका कडील सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्र सवलतीच्या दरात आजी व माजी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. या विकसकाने वाघोली येथील एक टॉवर सशस्त्र दलांसाठी डिझाइन करून समर्पित केला आहे.
‘उडचलो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “देशसेवा करणाऱ्यांना सेवा’ या आमच्या ब्रीदवाक्याशी आम्ही ठाम आहोत. सर्वसामान्य नागरी रहिवाशांच्या तुलनेत, सशस्त्र दलाच्या सेवेत असणाऱ्यांना घरखरेदी करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. योग्य मालमत्ता कशी ओळखायची; कर्जाची सुविधा कशी मिळवायची; महत्वाचे म्हणजे बिल्डर कायदेशीर औपचारिकता पूर्ण करेल का? असे अनेक प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभे असतात. या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक पद्धतीने देणाऱ्या, सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या विकसकांशी ‘उडचलो’ची टीम संपर्क साधेल आणि सर्वोत्तम दर्जाची घरे अतुलनीय किंमतींत, विनासायास उपलब्ध करून देईल.”
‘उडचलो’चे मुख्य व्यवसाय अधिकारी अभिजीत दास हे कंपनीच्या रिअल इस्टेट व्यवसायाचे नेतृत्व करणार आहेत. याबाबद बोलताना अभिजित दास म्हणाले, “रिअल इस्टेट क्षेत्राच्या गरजा आणि संरक्षण दलांच्या मागण्या यांकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष झाले आहे. ‘उडचलो’ने या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे, हा विशिष्ट ग्राहकवर्ग आता प्रमुख शहरांमधील काही उत्कृष्ट विकासकांच्या सर्वोत्तम सवलतींचा लाभ घेऊ शकेल.”
