fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

ज्येष्ठ नागरिकांची खंत दूर करण्यासाठी वेगळ्या व्यासपिठाची गरज- चंद्रकांत पाटील

पुणे:ज्येष्ठ नागरिकांना आपल्या उतारवयात जिवनात काही करायचे राहून गेले, याची खंत राहू नये, यासाठी वेगळे व्यासपीठ उपलब्ध असणे गरजेचे असून, त्यासाठीच मोबाईल प्रशिक्षण शिबीर एक माध्यम आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच, राजकारणातून निवृत्तीनंतर सीमेवरील जवानांची सेवा करण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून आठ आठवड्यांचे मोबाईल ट्रेनिंग शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरातील पहिल्या बॅचच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा डॉ. अलका भानू, श्री. शेजवलकर, सचिव श्री. आनंद आपटे, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे मनपा शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, मोबाईल ट्रेनिंग शिबीराच्या समन्वयक नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे, नगरसेवक जयंत भावे, स्विकृत सदस्या मिताली सावळेकर तसेच प्रशिक्षक श्री. बिंदूमाधव मेंडजोगे उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिकांना आपल्या उतारवयात पैसे कमावण्यापेक्षा शांत आरामदायी जीवन व्यतीत करावे असे वाटते. यावेळी त्यांना आपल्या आयुष्यात काही साध्य करायचे राहून गेले असल्याची खंत राहू नये, यासाठी या वयातही त्यांचे नियोजन असते. मला देखील राजकारणातून निवृत्तीनंतर सीमेवरील जवानांची सेवा करायला आवडेल. त्याचप्रमाणे इतर ज्येष्ठ नागरिकांनाही असे काही करायचे असल्यास, त्यांनी तशी इच्छा व्यक्त करावी. त्यांच्यासाठी आपण वेगळे व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ,” असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले.

ते पुढे म्हणाले की, “कोथरुडमधील नागरिकांच्या गरजा ओळखून अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकी कोथरुडमधील वाचकांसाठी फिरते पुस्तक घर, वस्ती भागातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी मोफत फिरता दवाखाना यांसह अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजच्या अधुनिक युगात ज्येष्ठ नागरिकांना टेक्नोसॅव्ही असणे गरजेचे असल्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी आठ अठवड्यांचे मोबाईल ट्रेनिंग शिबीराचे आयोजन केले होते. त्यातील पहिल्या बॅचचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. आता लवकरच पुढची बॅचही सुरु करणार,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिबीराच्या समन्वयक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाल्या की, “प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्यातील सेकेंड इनिंग अर्थपूर्ण करण्याची इच्छा असते. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या विविध उपक्रमातून कोथरुडकरांसाठी अराजकीय व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. मोबाईल ट्रेनिंग शिबीर हे त्यापैकीच एक असून, यासर्व अराजकीय व्यासपिठांबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.” यावेळी प्रशिक्षक श्री. बिंदूमाधव मेंडजोगे आणि एरंडवणे ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षा डॉ. अलका भानू यांनाही आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, आठ अठवड्यांचे मोबाईल ट्रेनिंग शिबीरात महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद घेतला. या शिबीरात यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आ. पाटील यांनी केली होती. त्यानुसार श्री. पुष्पहास फडके, सुचेता खेर आणि ज्योत्सना कणेकळ या विशेष सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी पुष्पहास फडके यांना स्मार्टफोन देऊन गौरविण्यात आले. तर इतर सहभागी ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading