fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

सायन्स पार्क सारख्या सर्व उपक्रमात मी विद्यापीठासोबत – बाबा कल्याणी

पुणे: “विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या हेतूने सुरू केलेल्या या उपक्रमात मला सहभागी करून घेतले त्याबद्दल मला आनंद आहे. मी या विद्यापीठाचा एक भाग असून यासारख्या पुढील प्रत्येक उपक्रमात मला सहभागी करून घ्या” असे उद्गार भारत फोर्ज लिमिटेडचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक पद्मभूषण बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले.

विज्ञान दिनाचे औचित्य साधून आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीत सायन्स पार्क सुरु करण्यात आले. या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बाबा कल्याणी बोलत होते. यावेळी परसिस्टंट सिस्टीम कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक व कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद चौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्रतिष्ठित प्राध्यापक आणि सायन्स पार्कचे समन्वयक डॉ. दिलीप कान्हेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बाबा कल्याणी पुढे म्हणाले, पूर्वी मोठ्या प्रमाणात गणितातील प्रयोग केले जात होते आता ते कमी झालेले पाहायला मिळतात. विद्यापीठात गणित म्युजियम सुरू करण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे, लवकरच त्याची माहिती देण्यात येईल.

विद्यापीठाने कायम प्रयोगशील राहायला हवे. समाजाचे प्रश्न विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून आपण कसे सोडवू शकतो यासाठी विचार करायला हवा, असे मत डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

विद्यापीठातील ‘सेन्टर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकेशन’ म्हणजेच सायन्स पार्कची सुरुवात २०१४ साली करण्यात असून आज सायन्स पार्क नव्या इमारतीत आज याचा नव्याने शुभारंभ करण्यात आला. यावेळी जवळपास १०० वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये स्वतःच्या मुळापासून ते पानापर्यंत स्वतः माहिती देणारे बोलके झाड, मुंग्यांच्या वारूळाची आतील रचना, सापळ्याचा उपयोग करून गमतीदार पध्दतीने केलेली ऊर्जानिर्मिती, वाफेचे इंजिन असणारी रेल्वे ते मेट्रोपर्यंतचा प्रवास सांगणारी जोशी रेल्वे म्युजियमने तयार केलेली ट्रेन, फुलपाखराचे जीवनचक्र असे अनेक प्रकल्प लहान मुलांचे आकर्षक ठरले. या सर्व प्रकल्पांची माहिती डॉ. कान्हेरे यांनी उपस्थितांना दिली.

सायन्स पार्कतर्फे काहीच दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या विज्ञानविषयक स्पर्धेतील विजेत्यांना आज पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading