वेश्याव्यवसाय सोडू इच्छिणाऱ्या महिलांच्या ‘क्लीन रेड’ प्रकल्पाच्या वर्षपूर्ती निमित्त छायाचित्र कथा प्रकाशन बुधवारी
पुणे : पुण्यातील बुधवारपेठेत सहेली संघाच्या वतीने आणि ए.एस.आर सर्व्हिसेस आणि स्वच्छ च्या सहकार्याने क्लीन रेड हा एक वेगळा उपक्रम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. वेश्याव्यवसाय सोडू इच्छिणार्या महिलांना सबळ रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या प्रकल्पाला यशस्वीपणे १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने या प्रकल्पाची छायाचित्र कथा, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे.
बुधवार दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सहेली संघाच्या कार्यकारी संचालिका तेजस्वी सेवेकरी यांनी दिली.
सहेली संघ, ए.एस.आर सर्व्हिसेस आणि स्वच्छ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहेली संघाच्या अध्यक्षा महादेवी मादर, ए.एस.आर सर्व्हिसेसचे तेजस भोसले, आणि स्वच्छचे आलोक गोगटे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, वेश्याव्यवसाय सोडू इच्छिणार्या महिलांना क्लीन रेड या प्रकल्पाच्या माध्यमातून एक सबळ रोजगार मिळाला आहे. या स्त्रिया आता वस्ती सफाई आणि कचरा व्यवस्थापन करू लागल्या आहेत. तसेच त्या सहेली संघ या पुण्यातील एकमात्र वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या संघटनेच्या प्रतिनिधीही आहेत.